देशातील निर्णय रस्त्यांवर नव्हे, तर संसदेतच होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे हे शिवसेनेतील सत्ताबदल थांबवू शकले नाहीत, तर दुसऱ्या कोणत्या सत्ताबदलाबाबत बोलत आहेत, हे मला माहिती नाही. त्यांच्या पक्षाने हिंदुत्व आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, तेव्हा पक्षात वादळ आले. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्यांनी खरी शिवसेना उभी केली. त्यांच्यासारख्या लोकांनी भारताच्या संविधानाशी लढणे बंद केले पाहिजे.
मुख्यमंत्र्यांनी घेतली सरसंघचालकांची भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालयाला भेट देऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. राज्यातील दुष्काळ, जेन झीच्या आंदोलनावरून तापलेले वातावरण, भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता, संघटनात्मक जबाबदाऱ्यांचे वाटप तसेच आगामी काळातील राजकीय आव्हाने या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत अधिकृत तपशील समोर आलेला नसला, तरी राज्यातील सध्याच्या घडामोडींच्या संदर्भात या भेटीकडे पाहिले जात आहे.
निवडणूक हेच माध्यम
लोकशाहीत निवडणुकीच्या माध्यमातूनच सत्ताबदल होऊ शकतो. संविधान नाकारून अन्य देशांप्रमाणे सत्ताबदल घडविण्याचा विचार करणाऱ्यांची स्वप्ने पूर्ण होणार नाहीत; उलट अशा लोकांचे उद्देश संविधानच समाप्त करेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विधानपरिषदेच्या पाचही जागा जिंकणार
नागपूर पदवीधर मतदारसंघात सुधाकर कोहळे यांना दुसऱ्या पसंतीच्या मतांपर्यंत जाण्याची गरज पडणार नाही. ते पहिल्या पसंतीच्या मतांच्या कोट्यावरच विजयी होतील. अमरावतीमध्ये किरण सरनाईक हे महायुतीचे उमेदवार असून, भाजप त्यांच्या पाठीशी आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिता जाधव या महायुतीच्या उमेदवार असून, संपूर्ण महायुती त्यांच्या पाठीशी आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही बैठक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत असली, तरी महायुतीमध्ये बेबनाव नाही. पाचही जागा महायुतीच जिंकेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.