एकदा बाहेर तो कायमचा बाहेर, दादा मोठ्या मनाचे होते, पण मी.. बघून बघून घेतलं, सुनेत्रा पवारांनी एकदाच सुनावलं
बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने बारामतीमधील राजकारण तापलं आहे. बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झालीय. पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र चूल मांडली आहे. भाजपच्या पाठिंब्याने ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’ त्यांनी निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नाव न घेता बंडखोर पुरुषोत्तम जगताप यांना थेट इशारा दिला आहे. “आपल्या सर्वांचे संबंध चांगले आहेत. नंतर कोण जवळ येणार अशा अनेक अफवा आहेत.कुठल्याही चुकीच्या अफवेला बळी पडू नका, एकदा बाहेर ते कायमचे बाहेर, एवढे लक्षात ठेवा.दादा खूप मोठ्या मनाचे होते दादांसारखी मी नाही” असा थेट इशाराच सुनेत्रा पवार यांनी नाव न घेता पुरुषोत्तम जगताप यांना दिला आहे.
“अनेक चुकीच्या अफवा ऐकायला येत असून कारखान्याचा अध्यक्ष हा सर्वसमावेशक असेल. सर्वांच्या मर्जीनूसार अध्यक्षांची निवड केली जाईल. अध्यक्ष अगोदर ठरवलेला नाही. निवडणुकीच्या निकालानंतर कोण अध्यक्ष ते ठरवू” असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.
अजितदादा पवार पॅनलचा जाहीरनामा प्रकाशित
काल अजित पवार यांचे सुपत्र जय पवार यांच्याहस्ते बारामतीत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पवार यांनी पुरुषोत्तम जगताप यांना इशारा दिला आहे.
दादांच्या आवाजाचा व्हिडिओ
“मला जेव्हा आधी पुरुषोत्तम जगताप यांच्यावर कारवाई करणार का, असं विचारलेलं. तेव्हा मी नाही म्हटलेलं. फक्त त्यांना दादांचे नाव आणि फोटो वापरू नये एवढचं सांगितलं होतं. पण काल त्यांनी सुनेत्रा पवार यांचा व्हिडिओ वापरून ते त्यांच्या पॅनेलचा प्रचार करत आहेत.त्यामुळे आम्ही पक्षाच्या वतीने त्यांच्यावर कारवाई करणार आहोत” असं जय पवार यांनी सांगितलं. त्यांनी दादांच्या आवाजाचा व्हिडिओ केला आहे. त्यामुळे त्याबाबत ही कारवाई करणार असं जय पवार म्हणाले.
युगेंद्र पवार यांच्यावर या पॅनलची जबाबदारी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता तिरंगी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल उभं करण्यात आलं आहे. युगेंद्र पवार यांच्यावर या पॅनलची जबाबदारी आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता दोन्ही पवारांसाठी ही निवडणूक महत्वाची आहे.