बारामतीतील माळावरच्या देवीच्या दर्शनासाठी भाविकांची वाढती गर्दी!...

बारामतीतील माळावरच्या देवीच्या दर्शनासाठी भाविकांची वाढती गर्दी!...

 

बारामती :  बारामती शहर आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे आराध्यदैवत असलेल्या माळावरच्या देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविक दर्शनासाठी येत असून, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. स्टेशनरी, कटलरी, आकर्षक नवनवीन भांडी, महिलांच्या भेटवस्तु लहान मुलांसाठी खेळणी आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारल्याने दरवर्षी प्रमाणेच परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.  

     ​सुमारे २१४ वर्षांपूर्वी बाळोबा राजाराम गाढवे यांनी या देवी मंदिराची स्थापना केली. तेंव्हा पासून नवरात्रोत्सवाची परंपरा भक्तिभावाने जपली जात आहे. गाढवे कुटुंबीयांकडेच मंदिराच्या देखभालीची जबाबदारी असून, सध्या या कुटुंबातील पाचवी पिढी मंदिराचे कामकाज पाहात आहे. मंदिराची रचना आकर्षक असून, बाहेरूनही देवीच्या मूर्तीचे दर्शन सहज घेता येते.नवरात्रौत्सवात दररोज सकाळी पूजा, दुपारी व संध्याकाळी आरती आणि भजन- कीर्तनाचे कार्यक्रम होतात. 

    अष्टमीला होम केला जातो.पाचव्या आणि सातव्या माळेला पंचक्रोशीतील भाविक विशेषत: महिला मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.पाचव्या दिवशी काठी उभारण्याचा कार्यक्रम होतो, यावेळी आराधी समाजातील भाविकांची विशेष उपस्थिती असते. उत्सव  काळात देवीच्या मूर्तीला विविध वाहनांवर विराजमान केले जाते.    

     दसरा म्हणजेच  विजयादशमीच्या दिवशी देवीची पालखी शहरात आणली जाते. शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढल्यानंतर पालखी पुन्हा मंदिरात नेली जाते. सीमोल्लंघनाच्या दिवशीही दर्शनासाठी अतिशय मोठी गर्दी असते.नवरात्रोत्सवाच्या काळात हे मंदिर श्रद्धा आणि उत्साहाचे बारामतीतील मुख्य केंद्र बनले आहे.