तीव्र दुष्काळ असूनही यंदा दिवाळीत मिळणार नाही ‘आनंदाचा शिधा’; आर्थिक चणचणीचा राज्यातील गरिबांना फटका
सोमवार, २६ ऑक्टोबर, २०२६
Edit
मुंबई : राज्यात तीव्र दुष्काळ असूनही यंदाच्या दिवाळीत राज्यातील गोरगरीब जनतेला यंदा ‘आनंदाचा शिधा’ मिळणार नाही. आर्थिक चणचणीमुळे राज्य सरकारने शिधावाटप न करण्याचे ठरविले आहे. ही योजना कागदावरच उरली असून दुष्काळातही आनंदाचा शिधा गरिबांना मिळणार नाही.
काय हाेती याेजना? काेणाला मिळत हाेता लाभ?
सरकारने दिवाळीत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय ४ ऑक्टोबर २०२२ रोजी घेतला होता. अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला. १४ जिल्ह्यांतील केशरी (एपीएल) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांनाही या संचाचे वाटप केले गेले.
२०२३ मध्ये गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळी या निमित्त आनंदाचा शिधा देण्यात आला होता. त्या संचामध्ये एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल आणि रवा, चणाडाळ, मैदा व पोहे प्रत्येकी ५०० ग्रॅम अशा सहा वस्तू देण्यात आल्या होत्या.
लागतो ६०० कोटींचा निधी : आनंदाचा शिधा देण्यासाठी प्रत्येक वेळी ५५०-६०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असते. ज्यावेळी शिधा द्यायचा असतो, त्यावेळी सूचना आल्यावर अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून मंत्रिमंडळापुढे खर्चाचा प्रस्ताव सादर केला जातो आणि तो मंजूर झाल्यावर निविदा काढून शिधावाटप केले जाते. यंदा अजून कोणत्याही सूचना न आल्याने मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव ठेवला नसल्याचे अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या उच्चपदस्थांनी ‘लोकमत’ला सांगितले.
आनंदाचा नाही, तर दुष्काळाचा तरी द्या
सध्या राज्यातील बहुतांश भागात भीषण दुष्काळ आहे. राज्य सरकारला दिवाळीसाठी आनंदाचा शिधा द्यायचा नसेल, तर दुष्काळाचा तरी द्यावा. शेतकऱ्यांना ५ हजार रुपये देणार, दुष्काळग्रस्तांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे सरकारने सांगितले. मग गोरगरीब जनतेला आनंदाचा शिधा
न देण्याचे कारण सरकारने सांगावे.
ॲड. सचिन सावंत,
सचिव, अ. भा. काँग्रेस कमिटी
किमान ही योजना बंद केल्याचे जाहीर करा
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आनंदाचा शिधा योजना सरकारने जाहीर केली. आम्ही कोणतीही योजना बंद करणार नाही, असे सांगितले होते. त्यावेळी शिधा असलेल्या पाकिटांवर नेत्यांनी फोटो छापून घेतले होते. यंदा दुष्काळ असूनही शिधा देणार नसल्याने गोरगरीब जनतेची दिवाळी अंधारात जाणार आहे. ही योजना बंद केल्याचे तरी जाहीर करावे.
खा. संजय राऊत,
प्रवक्ते, उद्धवसेना