पुण्यात भरवस्तीत तरुणीला उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला, आरोपीला पकडून चोपले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी (२४ ऑक्टोबर) सायंकाळी सुखसागरनगर भागातील समर्थ डेअरीसमोर घडली. पीडित १८ वर्षीय तरुणी रस्त्याकडेला आपल्या मैत्रिणीची वाट पाहत उभी होती. त्याच वेळी तिथे आलेल्या आरोपी जितू सरोज याने तिच्याशी अश्लील वर्तन केले. त्याने तरुणीच्या छातीला हात लावत तिचा शर्ट ओढून तिला थेट रस्त्यावरून उचलून नेण्याचा प्रयत्न केला.
आरडाओरड ऐकून धावले नागरिक
अचानक घडलेल्या या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने आरडाओरड सुरू केली. तिचा आवाज ऐकून तिची मैत्रीण आणि आजूबाजूचे स्थानिक नागरिक तत्काळ मदतीसाठी धावून आले. नागरिकांनी आरोपीला जागीच घेरले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे, तर जमावातील एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटून फोडला.
नागरिकांनी संतापून आरोपीला चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून विनयभंग, अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून भारती विद्यापीठ पोलीस पुढील तपास करत आहेत.