पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ; 'आठ मतपेट्यांना सील नाही', हर्षदा देशमुखांनी घेतला आक्षेप
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आज सकाळपासून बालेवाडी येथील केंद्रावर मतमोजणी सुरू झाली. प्राथमिक फेऱ्यांची प्रक्रिया सुरू असतानाच काही मतपेट्या तपासणीसाठी टेबलवर आणण्यात आल्या. त्या वेळी आठ मतपेट्यांना आवश्यक असलेले निवडणूक आयोगाचे अधिकृत सील नसल्याचे महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी दावा केला.
महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांनी यावर आक्षेप घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जाब विचारला.
विनासील मतपेट्या आढळल्याचे समजताच मतमोजणी केंद्रावर उपस्थित असलेल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतला. पोलिंग एजंट्सनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या मतपेट्या केंद्रात कशा आल्या, असा थेट सवाल केला. या गोंधळामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि आक्षेपांची पडताळणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी काही काळासाठी मतमोजणी प्रक्रिया स्थगित केली.
पुणे पदवीधरमध्ये हायव्होल्टेज लढत
पुणे पदवीधर मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. येथे भाजपच्या डॉ. स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात लढत रंगली आहे. सुशिक्षित आणि पदवीधर मतदारांचा कौल नेमका कोणत्या विचारसरणीच्या बाजूने झुकतो, हे आज स्पष्ट होणार असून दोन्ही उमेदवारांसाठी ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे.