'मीच दादा' असल्याचा आव कांहींनी आणलाय - सुनेत्रा पवार
![]() |
| सुपा येथील प्रचार सभेत मार्गदर्शन करतांना उपमख्यमंत्री सुनेत्रा पवार |
पुरुषोत्तम जगताप यांच्यावर खरपूस टीका
बारामती : "खरेतर श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणे अपेक्षित होते. मात्र,दादा हयात नसतांना 'मीच दादा' असल्याचा आव आणणारे कांहीजण पुढे आले आहेत,"अशी खरपूस टीका पुरुषोत्तम जगताप यांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुपा येथे केली आहे. "कारखाना सुरक्षित आणि सक्षमपणे पुढे कसा जाईल,याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे सभासदांनी कोणत्याही संभ्रमात न राहता 'पॅनेल टू पॅनेल' मतदान करावे,"असे आवाहनही पवार यांनी केले आहे.
सुपे येथील ख्वाजा शाहमन्सूर दर्गापरिसरात आयोजित प्रचार सभेत सुनेत्रा पवार बोलत होत्या.या वेळी त्यांनी कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की,साखर कारखाना हा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या संसाराशी जोडलेली नाळ आहे. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे कारखान्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी 'श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल'च्या उमेदवारांना 'पॅनेल टू पॅनेल' मतदान करण्याचे आवाहन पवार यांनी केले.
या वेळी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे,दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे, कारखान्याचे उमेदवार, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुपेचे सरपंच तुषार हिरवे यांनी केले. सूत्रसंचालन अशोक लोणकर यांनी केले.