सोमेश्वर कारखाना निवडणुक - अखेर पुरुषोत्तम जगतापांसह त्यांच्या पॅनलमधील सदस्यांचे राष्ट्रवादीतून निलंबन
शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२६
Edit
बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील राजकीय संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनल उभे करून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने त्यांच्याविरोधात कारवाई केली आहे. जगताप यांच्यासह त्यांच्या पॅनलमधील सदस्यांचे पक्षातून निलंबन केल्याची घोषणा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली.
सोमेश्वर कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यापासून तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी पुरुषोत्तम जगताप यांनी बंडखोरी करत स्वतंत्र पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरवले. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, संभाजी होळकर आणि बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पक्षाच्या भूमिकेपासून दूर जात स्वतंत्र पॅनल उभे केल्यामुळे पुरुषोत्तम जगताप यांच्यासह त्यांच्या पॅनलमधील सदस्यांवर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. स्व. अजितदादांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी ऐनवेळी वेगळी भूमिका घेणं पक्ष हितासाठी योग्य नाही. त्यामुळंच पक्षाकडून ही कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालानंतर पुरुषोत्तम जगताप पुन्हा स्वगृही परततील असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात होता. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने कारवाईचा बडगा उगारल्यानं जगताप यांच्या परतीचे दोर कापत कार्यक्षेत्रात होत असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.