शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान

 

बारामती : सेवा संकल्प अभियानांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोेपचार रुग्णालय, बारामती परिसर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

     महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील स्वच्छता राखणे, परिसराचे सौंदर्यीकरण करणे तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती वाढविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. अभियानात महाविद्यालयातील प्राध्यापक,वैद्यकीय व नर्सिंग विद्यार्थी, तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी, परिचारिका तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

     अभियाना दरम्यान महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. कचऱ्याचे योग्य संकलन व विलगीकरण, परिसर स्वच्छ ठेवणे आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच “स्वच्छ परिसर, निरोगी समाज” हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

      या उपक्रमाच्या नियोजनासाठी डॉ. मीनल शिंगाडे,सहयोगी प्राध्यापक,शरीरविकृतीशास्त्र विभाग यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रविण हाके यांनी समन्वया साठी सहकार्य केले.

      वैद्यकीय व नर्सिंग विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे स्वच्छतेचा संदेश विद्यार्थी,रुग्ण, नातेवाईक आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे.स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून महाविद्यालय व रुग्णालय परिसर सातत्याने स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे श्रीमती पाटील यांनी सांगितले.