पुरुषोत्तम जगताप यांच्यावर कारवाई करणार : जय पवार

पुरुषोत्तम जगताप यांच्यावर कारवाई करणार : जय पवार

 

सोमेश्वरच्या प्रचारात अजित पवारांचे नाव,फोटो वापरण्यास मनाई  

​​बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात अजितदादा पवार यांच्या नावाचा, छायाचित्राचा तसेच सुनेत्रा पवार यांच्या व्हिडिओचा परवानगी शिवाय वापर केल्याप्रकरणी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यावर पक्षाच्या वतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी स्पष्ट केले.  

     ​सोमेश्वर साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'श्री सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पवार पॅनेल'चा जाहीरनामा जय पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी जगताप यांच्यावर कारवाई होणार कां ? याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जय पवार म्हणाले, "अजितदादांचे नाव आणि छायाचित्र परवानगीशिवाय वापरू नये,असे आम्ही स्पष्टपणे सांगितले होते.मात्र, जगताप यांनी सुनेत्रावहिनींचा व्हिडिओ वापरून आपल्या पॅनेलचा प्रचार केला. तसेच अजितदादांचा आवाज असलेला व्हिडिओही वापरला आहे. त्यामुळे पक्षाच्या वतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. नेमकी कोणती कारवाई केली जाणार,हे लवकरच जाहीर केले जाईल.असेही जय पवार यांनी शेवटी स्पष्ट केले. 

​एका व्यक्तीमुळे ही परिस्थिती  

[​१] जगताप यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या इतर व्यक्तींवर कारवाईं केली जाणार नसल्याचे ही पवार यांनी स्पष्ट केले. "ही परिस्थिती एका व्यक्तीमुळे निर्माण झाली असून, हे सर्व जगताप यांच्यामुळे झाले आहे," असे त्यांनी सांगितले.  

[​२] अजितदादा पवार यांनी अनेक वर्षे महाराष्ट्रातील जनतेसाठी काम केले आहे. त्याच कार्यपद्धतीने सोमेश्वर कारखाना चालविण्यावर आमचा भर असून, त्यामागे कोणताही राजकीय स्वार्थ नसल्याचे जय पवार यांनी सांगितले. कारखाना योग्य पद्धतीने चालविणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

[​3] सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील भाजपच्या सहभागाबाबत विचारले असता, "ही कोणत्याही राजकीय पक्षाची निवडणूक नाही. त्यामुळे याकडे त्या पद्धतीने पाहिले जाऊ नये," असे जय पवार यांनी स्पष्ट केले.