बारामतीत पोलिसांकडून एकता दौड

बारामतीत पोलिसांकडून एकता दौड

 

​बारामती : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून शनिवारी ३१ऑक्टोबरला बारामती पोलिसांच्या वतीने 'एकता दौड'चे आयोजन केले होते.  

      ​राष्ट्रीय एकता, अखंडता,बंधुभाव आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्यासह अमली पदार्थमुक्त समाजाचा संदेश देण्यासाठी आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दौडमध्ये ४०० नागरिकांनी सहभाग नोंदवला.  

      ​शारदा प्रांगण ते सम्यक चौक आणि पुन्हा शारदा प्रांगण या मार्गावर दौड झाली. सहभागी नागरिकांनी राष्ट्रीय एकता, सामाजिक ऐक्य आणि अमली पदार्थमुक्त समाजाचा संदेश देत उत्साही पूर्ण वातावरणात दौड पूर्ण केली.  

     ​युवा पिढीने अमली पदार्थांपासून दूर राहावे, व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करावा आणि निरोगी व सक्षम समाजाच्या निर्मितीत योगदान द्यावे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्या सोबतच समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेला प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करणे हाही या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.  

    ​''एक भारत,अखंड भारत'' या भावनाला बळ देण्यासह समाजातील विविध घटकांमध्ये परस्पर सलोखा, बंधुभाव आणि एकतेची भावना दृढ करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.  

      ​या उपक्रमात बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव,बारामती विभागाचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक गणेश बिरादार,बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम, पोलिस निरीक्षक नारायण पवार,स. पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके, सोमनाथ शेंडगे व जीवन मोहिते यांचेसह पोलिस अधिकारी,कर्मचारी, नागरिक सहभागी झाले.