बाळासाहेब ठाकरेंचा अनादर करण्याचा हेतू नव्हता; शायना एनसी मुनोत यांची दिलगिरी
शायना एन.सी. यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत स्पष्टीकरण देताना खोटेनाटे आरोप करून बदनाम करण्याचं काम विरोधक करत आहेत. विरोधकांकडे खोटं बोलण्यापलीकडे काही नाही असं म्हटलं.
'बाळासाहेब माझ्यासाठी पितृतुल्य आणि देवतुल्य व्यक्तिमत्त्व'
वाद वाढल्यानंतर शायना एन.सी. यांनी पोस्ट लिहून आपली भूमिका स्पष्ट केली. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या जुन्या आठवणी सांगत त्यांनी त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला.
"काही माणसं आणि काही नाती आयुष्यभर काळजाच्या एका कोपऱ्यात घर करून राहतात. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझ्या आयुष्यातील असेच पितृतुल्य आणि देवतुल्य व्यक्तिमत्त्व. मी लहान असताना पहिल्यांदा बाळासाहेबांना भेटले. ते माझ्या वडिलांचे अत्यंत जिवलग मित्र होते. आमच्या कुटुंबाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक वर्षे त्यांचा अखंड सहवास आम्हाला लाभला, आशीर्वाद मिळाले. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणी, म्हणजेच माझ्या लग्नालाही ते आवर्जून उपस्थित राहिले होते," असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
'बाळासाहेब प्रखर देशभक्त आणि सावरकरांचे निस्सीम चाहते'
'माझ्या कृतीचा जाणीवपूर्वक विपर्यास केला'
"बाळासाहेबांविषयी तमाम जनतेच्या मनात असलेली श्रद्धा आणि प्रेम मला पूर्णपणे समजते. माझ्यासाठी आणि कोट्यवधी लोकांसाठी बाळासाहेब हे केवळ एक नेते नव्हते, तर दैवत होते. माझ्या कृतीमुळे जर खऱ्या शिवसैनिकांच्या किंवा बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील, तर मी मनापासून त्यांची माफी मागते. पण, ज्यांनी माझ्या या कृतीचा विपर्यास करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मला ठणकावून सांगायचे आहे की बाळासाहेबांवरचे माझे प्रेम आणि निष्ठा सिद्ध करण्यासाठी मला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही," असेही शायना एन. सी. यांनी म्हटलं.
"सत्ता आणि स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणाऱ्यांनी मला बाळासाहेब शिकवू नयेत. काही नाती आणि काही ऋणानुबंध तुमच्या सत्तेच्या आणि स्वार्थाच्या राजकारणापलीकडे असतात. बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी हीच माझी खरी ताकद आहे, आणि ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही", असेही त्यांनी पोस्टच्या शेवटी म्हटले आहे.