दादर स्टेशनचं नवं नाव 'चैत्यभूमी', राज्याचं केंद्र सरकारला पत्र; अधिवेशनात आवश्यक पूर्तता करणार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी विविध सुविधा, सुरक्षा, वाहतूक, आरोग्य आणि स्वच्छतेच्या व्यवस्थांचे काटेकोर व समन्वित नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्यास राज्य शासनाने यापूर्वीच तत्वतः मान्यता दिली असून केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार विधानमंडळाच्या समितीशी संबंधित आवश्यक प्रक्रियेची पूर्तता विधीमंडळ अधिवेशनात करून नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आजच्या बैठकीत प्राप्त झालेल्या सर्व सूचनांची नोंद घेण्यात आली असून, अनुयायांच्या सुविधा, सुरक्षितता आणि सुव्यवस्थित नियोजनासाठी शक्य त्या सर्व बाबींवर कार्यवाही करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा आणि त्यांच्या विचारांचे स्मरण करण्याचा दिवस असून, देशभरातून येणाऱ्या अनुयायांना सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. सर्व विभागांच्या समन्वित प्रयत्नांतून यंदाचा महापरिनिर्वाण दिन शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने पार पाडण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इंदू मिल येथील स्मारकाच्या कामासाठी वाढीव निधी कमी पडू देणार नाही
दरम्यान, इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून मुख्य पुतळ्याचे काम पूर्ण करण्यासंदर्भात काही बाबी प्रलंबित आहेत. कामाच्या खर्चात वाढ झाली तरी त्याची भरपाई करण्यास शासन तयार असून उर्वरित काम गतीने पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्यात येईल असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.