पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांना होणार फायदा

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांना होणार फायदा

 


मुंबई : राज्यातील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांना आता राज्यातील मैदाने विनामूल्य उपलब्ध होणार आहेत. तरुणांना विनामूल्य मैदाने उपलब्ध व्हावीत यासाठी मिशन खाकी' अंतर्गत गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. उमेदवारांच्या मेहनतीला योग्य पायाभूत सुविधांची जोड मिळावी आणि त्यांच्या पोलीस दलात सेवा करण्याच्या स्वप्नाला बळ मिळावे यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना २७ ऑक्टोबर २०२६ रोजी पत्र लिहून निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार नगरविकास विभागाने अधिसूचना जारी केली असून या निर्णयाने राज्यातील लाखो तरुणांना दिलासा मिळाला आहे. 

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात राज्यभरात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी 'मिशन खाकी' मोहीम सुरू केली आहे. याआनुषंगाने त्यांनी राज्यभरातील तरुणांशी संवाद साधला. अनेकदा मैदाने उपलब्ध होत नसल्याने तरुणांना भरतीची तयारी करण्यात मोठ्या अडचणींचा सामोरे जावे लागत होते. 'सरावासाठी मैदानांची उपलब्धता' ही त्यांची सर्वात मोठी गरज असल्याचे प्रकर्षाने समोर आले होते. युवकांच्या या अडचणीची उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ दखल घेत हा लोकोपयोगी निर्णय मार्गी लावला. त्यामुळे पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्नांची बाळगलेल्या लाखो तरुणांचा आत्मविश्वास वाढणार असल्याचं राज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलं.

नगर विकास विभागाने काढलेल्या अधिसूचनेनुसार, राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींच्या मालकीची मैदाने, क्रीडांगणे आणि त्यांच्या अंतर्गत व्यवस्थापन होत असलेली मैदाने पोलीस भरतीच्या उमेदवारांना सरावासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ते संबंधित संवर्गाची मैदानी चाचणी संपेपर्यंत सरावास पहाटे 05:00 ते सकाळी 09:00 अथवा सायंकाळी 04:00 ते रात्री 08:00 वाजेपर्यंत परवानगी द्यावी असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, त्याचबरोबर स्वच्छ व सुरक्षित मैदान, क्रीडांगण, धावपट्टी तयार करून घेणे. सरावासाठी आलेल्या तरुणांना शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालय आणि प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्राथमिक उपचाराची सोय करून देण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, शिवछत्रपती क्रीडा संकुल, जिल्हा पोलीस प्रशिक्षण केंद्रे तसेच मान्यताप्राप्त क्रीडा संघटना यांचे सहकार्य घेण्यात यावेत अशा सूचनाही जारी केलेल्या परिपत्रकात करण्यात आल्या आहेत.