तुकाराम मुंढेंनी पुण्याचा कारभारी बदलला; महिन्याभरात एफडीएच्या कारवायांना वेग, तपासण्या आणि नमुने संकलनात पुणे राज्यात अव्वल!
पुणे : अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गेल्या महिन्यात पुणे विभागाच्या कारभारात बदल करून नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्याचबरोबर राज्यातील विविध विभागांतील काही अधिकाऱ्यांचे निलंबन करून त्यांच्या जागी कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रशासकीय बदलांचे सकारात्मक परिणाम पुणे विभागातील कामकाजात दिसू लागले असून, गेल्या महिनाभरात अन्न व औषध प्रशासनाच्या कारवायांना वेग आला आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीतील आकडेवारीतही पुणे विभागाने राज्यात आघाडी घेतली आहे. या कालावधीत पुणे विभागात तब्बल ६ हजार ९२४ आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून, अन्नपदार्थांचे ४ हजार ६४४ नमुने विश्लेषणासाठी संकलित करण्यात आले. राज्यातील सात विभागांच्या तुलनेत तपासणी आणि नमुने संकलनात पुणे विभाग प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
‘एफडीए’च्या २० नोव्हेंबरच्या अहवालानुसार, राज्यात या सात महिन्यांत एकूण २५ हजार ५१४ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्याध्ये पुणे विभागाचा वाटा सर्वाधिक आहे. पुण्यानंतर कोकण विभागात ५ हजार ५८९, मुंबईत ४ हजार १८६ आस्थापनांची तपासणी झाली. पुण्यात तपासणी झालेल्या आस्थापनांपैकी २ हजार ५३१ ठिकाणी सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर २२४ परवाने निलंबित करण्यात आले. राज्यभरात एकूण ११ हजार ५०६ सुधारणा नोटिसा आणि १ हजार ६५१ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्येही राज्यातील सर्वाधिक सुधारणा नोटीसा पुणे विभागात बजावण्यात आल्या आहेत.
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी पुणे विभागातून ४ हजार ६४४ नमुने घेण्यात आले. राज्यातील सर्व विभागांमध्ये ही संख्या सर्वाधिक आहे. या नमुन्यांच्या विश्लेषणातून १ हजार ६२३ नमुने प्रमाणित, ७६ कमी दर्जाचे, ३४ चुकीची नाममुद्रा असलेले, तर ११३ नमुने असुरक्षित असल्याचे आढळले. या प्रकरणांत २४ परवाने निलंबित करण्यात आले. राज्यभरात १८ हजार २१५ नमुने संकलित करण्यात आले. ३९८ नमुने असुरक्षित आढळले आहेत.
दूध, तेल आणि मसाल्यांवरही लक्ष
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या तपासणीत पुणे विभागाने मोठी कारवाई केली आहे. ३६२ आस्थापनांची तपासणी करून ४७३ नमुने घेण्यात आले. या कारवाईत १ लाख ५७ हजार ९६५ लिटर दूध जप्त करण्यात आले. जप्त साठ्याची किंमत ६६.७३ लाख रुपये आहे. या प्रकरणांत चार गुन्हे दाखल करून ४६ जणांना अटक करण्यात आली. खाद्यतेलाच्या तपासणीत २४१ ठिकाणी तपासणी करून २३३ नमुने घेतले, तर २६०.७४ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. मसाल्यांच्या तपासणीत १९८ ठिकाणी तपासणी, ३२१ नमुन्यांचे संकलन आणि ५६१.५० लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
अन्नसुरक्षेच्या कारवाईत पुणे विभागाची आघाडी
एका दिवसात विक्रमी ९६ धडक मोहिमा..
पुणे विभागात कारभारी बदलला अन एकाच दिवसात ९६ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. प्रथमच पुणे विभागात एकाच दिवसात एवढी मोठी कारवाई झाली असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगरचे अन्न विभागाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांच्याकडे १ नोव्हेंबर २०२६ पासून पुणे विभागाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला. तेव्हापासून पुणे विभागात नमुने संकलन मोठ्या प्रमाणावर होत आहे.
दररोज किमान १५ ते २० तक्रारी येत आहेत. तक्रारींचा ओघ वाढत असून, या सर्वांची दखल घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. तपासणी करताना वेगळी पद्धत वापरली जात आहे. एखाद्या भागात ज्या तक्रारींची यादी केली जाते, त्यानुसार कारवाईसाठी मोहीम हाती घेतली जाते. यामुळे अधिकाधिक नमुने गोळा केले जात आहेत. अशी माहिती अन्न व औषध पुणे विभाग, अन्न सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिली.