पवारांच्या निवृत्तीची चर्चा, सुळेंचा सवाल; फडणवीसांकडूनही सक्रियतेची ग्वाही!
मुंबई : शरद पवार यांच्या राज्यसभेची अद्याप पाच वर्षे शिल्लक असताना ते निवृत्त कसे होतील, असा सवाल त्यांच्या कन्या खा. सुप्रिया सुळे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘शरद पवार आपल्या आयुष्यात कधीही थांबणार नाहीत. काही ना काही सकारात्मक काम ते करतच राहतील,’ असा विश्वास व्यक्त केला. खा. संजय राऊत यांनी पवारांच्या राजकारणाचा संदर्भ विचारधारेशी जोडत त्यांच्या संभाव्य भूमिकेबाबत भाष्य केले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवृत्तीबाबत विविध आडाखे बांधले जात असताना सुळे यांनी त्यांच्या राज्यसभेतील कार्यकाळाचा मुद्दा पुढे केला. “शरद पवार निवृत्त होणार नाहीत. कोणी निवृत्त व्हायचे हे जनता ठरवणार. शरद पवार यांच्या राज्यसभेची अजून पाच वर्षे बाकी आहेत, मग ते निवृत्त कसे होतील?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
संजय राऊत यांनी या चर्चेला केवळ निवृत्ती किंवा वयाचा विषय न मानता वैचारिक संघर्षाचा संदर्भ दिला आहे. ते म्हणाले की शरद पवारांचे संपूर्ण राजकीय आयुष्य धर्मांध शक्तींविरुद्ध लढण्यात आणि फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार जिवंत ठेवण्यात गेले. काही लोकांना सत्तेत जाण्याची घाई झाली असेल आणि त्यासाठी शाहू-फुले-आंबेडकर यांची विचारधारा बाजूला ठेवली जात असेल, तर ते योग्य नाही पण शरद पवार असे करतील, असे वाटत नाही.
ज्येष्ठ नेते आणि अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांना सांगितले की शरद पवार हे एनडीएसोबत जातील असे मला वाटत नाही. एखाद्या विषयावर त्यांना योग्य वाटले तर ते केंद्रातील भाजप प्रणित एनडीए सरकारला मदत करू शकतात. शरद पवार स्वतः भाजप सोबत जातील असे मला वाटत नाही. अर्थात ते निर्णय घेत नाही तोपर्यंत चर्चाही सुरू असते. कोणालाही त्याबाबत निश्चित सांगता येत नाही.
पवारांच्या सक्रियतेची प्रशंसा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवार यांच्या कार्यपद्धतीची आणि सक्रियतेची प्रशंसा केली. पवारांना चांगले आरोग्य लाभावे, ही सर्वांची इच्छा असल्याचे सांगतानाच ते आजही विविध प्रकल्प आणि कामांमध्ये रस घेत असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
“मी जवळून शरद पवार यांचे व्यक्तिमत्त्व पाहिले आहे. ते सातत्याने वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये व कामांमध्ये रुची घेत असतात. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीची चर्चा करणे योग्य नाही. ते कधीही थांबणार नाहीत. काही ना काही सकारात्मक काम ते करतच राहतील,” असे फडणवीस म्हणाले.