इंदापूरच्या कुरुक्षेत्रात राष्ट्रवादीच्या नाराज गटाचे सीमोल्लंघन
मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०२४
Edit
माने, जगदाळे, शहा यांचा अपक्ष लढण्याचा निर्धार. प्रवीण माने किंवा अप्पासाहेब जगदाळे संभाव्य उमेदवार
इंदापूर (तानाजी काळे) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाच्या नाराज गटाने हजारोंच्या संख्येने इंदापूरच्या कुरुक्षेत्रावर परिवर्तन मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येत, इंदापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवायचीच असा निर्धार व्यक्त करीत आज 'सीमोल्लंघन' केले.
शुक्रवारी येथे पार पडलेल्या 'परिवर्तन मेळाव्यात पक्षाच्या नाराज गटाचे प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळे व भरत शहा यांनी हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांचा परिवर्तन मेळावा घेतला. कार्यकर्त्यांची मते आजमावून इंदापूर विधानसभेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढवायचीच असा निर्धार व्यक्त केला.
यावेळी बोलताना सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख व पुणे जिल्हा परिषदेचे कृषी खात्याचे माजी सभापती दसरथ माने म्हणाले, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे 'विठ्ठल 'आहेत. इंदापूरच्या उमेदवारी बाबत अध्यक्षांनी फेरविचार करावा अन्यथा इंदापुरात 'सांगली पॅटर्न' निर्माण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न केले. राष्ट्रवादीत फूट पडल्या नंतरही आपल्याच विचाराने आम्ही पुढे जात आहोत . मात्र पक्षात नुकतेच प्रवेश केलेल्यांना उमेदवारी जर देण्यात येत असेल तर आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. इंदापूर विधानसभा मतदारसंघातील ही निवडणुक 'सांगली पॅटर्न' झाल्याशिवाय राहणार नाही. असे नमूद करून उमेदवारीचा फेरविचार करा. अशी आर्त विनंती करीत उपस्थितांना हात उंचावून टाळ्यांची साथ देण्याची
साद घालून विठ्ठलनामाचा अक्षरशः धावा केला. यावेळी परिवर्तन मेळाव्याला काही काळ विठ्ठलनामाच्या गजराने प्रति पंढरपूर चे स्वरुप आले होते.
माने पुढे म्हणाले, की १९५२ पासून इंदापूर तालुक्यावर घराणे शाही लादली गेली आहे. जुन्या काळामध्ये शंकरराव पाटील व त्यांच्या समवयस्क नेत्यांनी एक चांगल्या पद्धतीचे समाजकारण केले.
१९९५ ला हर्षवर्धन पाटलांना कॉंग्रेसची उमेदवारी न दिल्याने बंडखोरी करण्यासाठी आम्हीच पुढे होतो. त्यावेळी ते सेना -भाजप सरकारमध्ये मंत्री झाले. ते पुढे कॉंग्रेसमध्येही मंत्री झाले. नंतर ते 'भाजपा'त मध्ये गेले. आता तर ते या पक्षात येऊन आमचा तंबूच घेऊन चाललेले आहेत. सर्वसामान्यांची मागणी आहे. आता नको आजी, नको माजी आता इंदापूर तालुक्याला पाहिजे नवा बाजी.
इंदापूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा पराभव झालेल्या हर्षवर्धन पाटलांना कोणत्या निकषावर उमेदवारी जाहीर केली ? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.
जिल्हा बँकेचे संचालक व इच्छुक उमेदवार अप्पासाहेब जगदाळे म्हणाले, सातत्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधानसभेच्या उमेदवारीचा शब्द देण्यात आला. मात्र तो पाळला गेला नाही. मी गेली पंचवीस वर्षे मतदार संघामध्ये विविध संस्थांच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करीत न आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मला डावलले. त्यामुळे मी हर्षवर्धन पाटील यांना मदत न केली. त्यावेळीही त्यांनीही या निवडणुकीत मला मदत करण्याचा शब्द दिला होता. मात्र आता ते मी ज्या पक्षात आहे तेथेच ते आलेले आहेत. आता ही लढाई केवळ मामा-भाच्यातली उरली नाही. ही लढाई आता तत्त्वाची लढाई झालेली आहे. आता आम्ही लढणारच आहोत. या निवडणुकीत कोण सीमोल्लंघन करतंय. ते आता आगामी काळच ठरवेल.
भाषणात जोरदार आक्रमक पवित्र घेत इंदापूरच्या उमेदवारी बाबत समोरच्या जनतेकडे पाहून तरी पक्षाच्या अध्यक्षांनी फेर विचार करावा. लोकांच्या भावना त्यांनी पुन्हा एकदा समजावून घ्याव्यात. तालुक्यातील आजी- माजी नेतृत्वाला आता तालुक्यातील जनताच कंटाळलेली आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. तालुक्यातला कार्यकर्ता आता वादळासारखा पेटून उठला आहे. आणि हे वादळ उभ्या महाराष्ट्रभर गेल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य बांधकाम खात्याचे माजी सभापती व इच्छुक उमेदवार प्रवीण माने म्हणाले इंदापूर तालुक्यात गेली चाळीस वर्षे शेतीच्या पाण्याचा प्रश्न, उजनीच्या पाण्याचा प्रश्न, उजनी धरणग्रस्तांचे प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न उद्योगधंद्याचा प्रश्न, महिलांचे प्रश्न अशा प्रश्नांची मालिकाच आहे. तालुक्यातील सर्वसामान्य जनता सातत्याने भरडली जात आहे. त्यांना न्याय मिळत नाही. त्यांच्या न्याय हक्कासाठी आता सर्वसामान्य जनतेच्या मनातूनच हा आवाज आलेला आहे. ही निवडणूक आता लढवायची. निवडणुकीतला उमेदवार आप्पासाहेब जगदाळे असतील किंवा मी असेल कोणीही उमेदवार असला तरी आपण स्वतः उमेदवार म्हणूनच आपण सर्वांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बाबासाहेब चवरे, भरत शहा, दत्तात्रेय फरतडे, तुषार जाधव, बबनराव लावंड, शकील सय्यद, बाळासाहेब हरणावळ, बाळासाहेब भंडलकर, अमोल मुळे, योगेश जगताप आदींची भाषणे झाली. विलासराव माने वसंत मोहोळकर कुमार माने, योगिराज काळे, जगन्नाथ काळे, देविदास भोंग, तुषार चव्हाण आदीसह कार्यकर्ते, महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती.