दिवाळीत रेशनधान्य दुकाने 'बंद'

दिवाळीत रेशनधान्य दुकाने 'बंद'

 


पुणे :- दिवाळीच्या काळात राज्यातील रेशनधान्य दुकानदारांकडून बंदची घोषणा करण्यात आली आहे.शुक्रवार दि.१ नोव्हेंबर पासून प्रतिक्विंटल ३०० रुपयांनी नफ्यात वाढ करण्याच्या प्रमुख मागणीसाठी वितरण बंद ठेवण्याचा इशारा अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवाना धारक महासंघाने दिलेला आहे.

अगोदरच सर्वसामान्य नागरिकांना दिवाळीत दरवर्षी शिध्यातून उपलब्ध होणारी साखर मिळणार नाही,तर आतां दुकानदारांच्या बंदमुळे प्रत्येक महिन्याला मिळणारा गहू आणि तांदूळ देखील मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. बंदच्या संदर्भात आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यावर कुठलाही निर्णय न झाल्याने दुकानदार बंद करण्यावर ठाम आहेत. 

या आहेत प्रमुख मागण्या

■ 'सण, उत्सवांच्या काळात शासनाकडून देण्यात येणाऱ्या 'आनंदाचा शिधा' या संचाच्या विक्रीसाठी पंधरा रुपयांचा नफा द्यावा.

■ प्रत्येक दुकानदाराला एक हजार लोकसंख्येप्रमाणे नफा प्रत्येक महिन्याला द्यावा.

■ दुकानांसाठी व्यावसायिक दराने वीजपुरवठा न करता तो घरगुती दराने द्यावा. मालमत्ता करात सवलत मिळावी.

धान्य वितरण ठप्प होण्याची शक्यता

अगोदरच गहू आहे,तर तांदूळ नाहीत,अशी परिस्थिती पुरवठा विभागाकडून होत असलेल्या धान्याच्या वितरणाची झाली आहे.त्यात बंदमुळे वितरण व्यवस्थेवर परिणाम होणार असून,याबाबत तोडगा निघाला नाही,तर सर्वसामान्य नागरिकांना दिवाळीच्या काळात धान्य मिळणे अवघड होणार आहे. महासंघाकडून धान्य उचल आणि वितरण बंद ठेवण्याचा इशारा दिल्याने जिल्ह्यासह शहरातील धान्य वितरण ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारकडून वारंवार मागणी करूनही आमचे प्रश्न सुटले गेले नाहीत, म्हणून आम्हांला हा बंद करण्याची वेळ आली आहे. नागरिकांना त्रास होऊ नये,ही आमची भूमिका असून,शासनाने आमच्या मागण्यांचा योग्य विचार करावा. -
अध्यक्ष,स्वस्त धान्य दुकानदार संघटना