माळेगाव साखर कारखान्याचे अंतिम बिल ४३६ रुपयांनी जमा; राज्यात उच्चांकी भाव ; कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस

माळेगाव साखर कारखान्याचे अंतिम बिल ४३६ रुपयांनी जमा; राज्यात उच्चांकी भाव ; कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस

 


बारामती  :- महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यामध्ये नावाजलेल्या शिवनगर येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम सन  २०२३-२०२४ मधील गाळप केलेल्या उसाचे हंगाम २०२३-२०२४ मधील अंतिम पेमेंट ४३६ रुपये प्रती टनांप्रमाणे सभासदांचे खात्यावर बुधवार दि.२३ ला वर्ग केले. या आर्थिक वर्षामध्ये कारखान्याचे कर्मचारी, अधिकाऱ्यांना २५ टक्क्यांप्रमाणे बोनस जाहिर केला आहे.

 माळेगाव कारखान्याने अदा केलेला भाव हा राज्यात उच्चांकी स्वरुपाचा आहे,असे कारखाना  अध्यक्ष ॲड.केशवबापू जगताप यांनी यावेळी सांगितले.हंगामा मध्ये एकूण गाळप १३,२७,९०८ टन उसाचे गाळप करून सरासरी रिकव्हरी १२.०२३ नुसार 

१५,२०,००० क्विटल इतके साखर उत्पादन घेतले आहे. हंगामाची देय एफआरपी रुपये २८३०.६७ प्रती मे.टन आहे. एकूण भाव रुपये ३६३६ रूपये प्रती टन इतका जाहिर केला आहे.तो दर एफआरपीपेक्षा ८०६ प्रती टन जादा आहे.यापूर्वी कारखान्याने ३२०० रुपये प्रति टनाप्रमाणे रक्कम अदा केली आहे. कार्यक्षेत्रातील सभासद, बिगर सभासद व गेटकेन धारकां चे पेमेंट रुपये ४६ कोटी तसेच सभासद ठेवीवरील व्याज व ऐच्छीक ठेवीवरील व्याज रक्कम ३ कोटी ३८ लाख रुपये अशी एकूण ४९ कोटी ३८ लाख इतकी रक्कम बँकेत वर्ग केलेली आहे. कर्मचारी बोनससाठी ६ कोटी २२ लाखाची ठरल्याप्रमाणे बोनस रक्कम ही दोन दिवसांत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली आहे.अंतिम ऊस पेमेंट इतर देणी अशी एकूण रक्कम रुपये ५५ कोटी ६० लाख वर्ग करण्यात आलेत.

यंदा जादा गाळपाचा मानस

कारखान्याचे चेअरमन ॲड. केशवराव जगताप म्हणाले की, सहकारी चळवळीच्या माध्यमा तून समाज परिवर्तन करण्याचे हेतूने कारखान्याने साखर उद्योगा च्या व उपपदार्थ निर्मीतीची यशस्वी वाटचाल केलेली आहे. यामध्ये कारखान्याचे संचालक मंडळ,कर्मचारी व अधिकारी यांचा मोलाचा वाटा आहे. २०२४-२०२५ चे हंगामाच्या पूर्व तयारीसाठी कारखान्यामधील अंतर्गत कामे चालू असून गळीत हंगाम वेळेत सुरु करण्याचे दृष्टीने सर्व विभाग प्रमुख प्रयत्नशिल आहेत.सर्व कामांची वेळेत पूर्तता करणेबाबत चेअरमन,संचालक मंडळ,कार्यकारी संचालक यांनी सूचना केलेल्या आहेत.यावर्षी पर्जन्यमान चांगले आहे.हंगामात जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.उच्चांकी ऊस दरामध्ये कारखान्याचे सभासद, व्यवस्थापन,ऊसतोडणी वाहतूकदार,कर्मचारी,अधिकारी यांचे योगदान आहे.