पक्ष चिन्हाबाबत अजितदादांना मोठा दिलासा..!; शरद पवार गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
बुधवार, २३ ऑक्टोबर, २०२४
Edit
नवी दिल्ली: राज्यात सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे.
अशातच मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या घड्याळ या
चिन्हाला विरोध दर्शवत शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात
आली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह कायम राहणार आहे. दरम्यान,
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत अजितदादांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा
दिलासा दिला आहे.
मागील वर्षी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात मोठी फुट पडली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजप-सेना
सरकारमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर पक्षाचा वादही निवडणूक आयोगापर्यंत
पोहोचला होता. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार
यांना दिले होते. त्यावर शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आक्षेप घेत
घड्याळ हे चिन्ह वापरण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती.
आज सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे अजितदादांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज न्यायालयात झालेल्या सुनावणीत विधानसभा निवडणुकीपुरते घड्याळ हे चिन्ह काढून घ्यावे अशी मागणी शरद पवार गटाच्या वकिलांकडून करण्यात आली. मात्र त्यावर आक्षेप घेत अजित पवार गटाच्या वकिलांनी आमच्या उमेदवारांनी या चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं सांगत ही मागणी फेटाळून लावण्याची मागणी केली.