
जळोची भाजी मार्केटमध्ये फुल मार्केटचा शुभारंभ ; दुपारी १२ वाजतां लिलाव !
बारामती:- बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे जळोची भाजी मार्केट मध्ये आज महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुण्यतिथी निमित्ताने फुल मार्केटचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती सुनिल पवार यांचे शुभहस्ते करण्यात आला.
आज २८ नोव्हेंबर रोजी महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथीचे औचित्य साधुन बारामती बाजार समितीने फुल मार्केटचा शुभारंभ केल्याने याचा आनंद होत आहे असे सभापती सुनिल पवार यांनी शुभारंभ प्रसंगी मत व्यक्त केले. फुल उत्पादक शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा व आपल्या फुलांची विक्री जळोची मार्केट मध्ये करावी असे उपसभापती निलेश लडकत यांनी सांगितले.
यावेळी झेंडुला कमाल ३५ रूपये प्रति किलो दर निघाला तर शेवंती ३० ते ४३ प्रति किलो आणि गुलाब शेकडा २०० ते ५०० रूपये, पासली पेंडी शेकडा १००० ते १७०० पर्यन्त अशी विक्री झाली. मार्केट मध्ये फुलांची विक्री उघड लिलाव पद्धतीने सुरू केली असल्याने फुलांचे दर चांगले निघतील.
सुट्टीचे दिवस सोडुन रोज दुपारी बारा वाजता फुलांचे लिलाव होतील. सर्व फुल उत्पादक शेतक-यांनी आपली फुले लिलावा पुर्वी वेळेत आणि चांगल्या पॅकींग मध्ये आणावीत. भविष्यात फुल मार्केट साठी विविध सुविधा मा. संचालक मंडळ पुरविणार असलेचे आश्वासन समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिले.
यावेळी बाजार समितीचे संचालक संतोष आटोळे, फळे व भाजीपाला अध्यक्ष सईद बागवान, आडदार प्रवीण भोईटे, संजय गदादे, मनोज नेवसे तसेच शेतकरी उपस्थित होते. आभार सईद बागवान यांनी मानले.