
बारामतीच्या आनंद लोखंडेला रायपूर पोलिसांची नोटीस; रायपूरच्या उद्योजकाची केली एक कोटींचा फसवणुक
बारामती:- बारामतीतील आनंद सतीश लोखंडे यानं केवळ उद्योजक आणि अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. अशातच आता त्याने छत्तीसगढमधील रायपूर येथील एका उद्योजकाला १ कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. आनंद सतीश लोखंडेने २५ टन लोणी खरेदी करून त्याची रक्कमच दिली नसल्यानं या उद्योजकाने रायपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
बारामतीजवळच असलेल्या एका मतदारसंघातील नेत्याची जवळीक सांगून या लखोबा लोखंडेनं अनेकांना गंडा घातला आहे. आपला मोठा डेअरी प्रकल्प असून आपण अनेक नामांकित कंपन्यांसोबत व्यवसाय करतो असं दाखवून या लखोबानं अनेकांना फसवलं आहे. आपण संबंधित नेत्यांचे सगळेच व्यवहार पाहतो, तसेच त्यांच्या कंपन्यांशीही आपले व्यावसायिक संबंध आहेत असं भासवत या लखोबाने मोठ्या प्रमाणात आर्थिक माया जमवली आहे.
मुंबईतील एका उद्योजकाला १० कोटी रुपयांना फसवणाऱ्या या आनंद सतीश लोखंडेने छत्तीसगढमधील रायपूर येथील उद्योजकाकडून २५ टन लोणी खरेदी करून त्याची १ कोटी ४ लाख एवढी रक्कमच दिली नसल्याची तक्रार रायपूर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. जून २०२४ मध्ये रायपूर येथील उद्योजक शंकर नाथानी यांच्या आनंद इंडस्ट्रीजमध्ये संपर्क साधत आनंद सतीश लोखंडे आणि विद्या सतीश लोखंडे यांनी २५ टन लोणी खरेदीची बोलणी केली. आपण टप्प्याटप्प्याने याची रक्कम अदा करू असं आश्वासनही त्याने दिलं. प्रत्यक्षात मात्र माल घेतल्यानंतर लखोबाने संबंधित उद्योजकाला रक्कम देण्यास टाळाटाळ केली.
दरम्यानच्या काळात आनंद सतीश लोखंडे या उद्योजकाचे फोनही घेणं बंद केलं. त्यामुळं आपली फसवणूक झाल्याचं शंकर नाथानी यांच्या लक्षात आलं. त्यांनी थेट रायपूर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. रायपूर पोलिसांनी आनंद सतीश लोखंडे आणि विद्या सतीश लोखंडे या दोघांना नोटीस काढत दि. २ मे रोजी रायपूर पोलिस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. रायपूर पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार आहे. त्यामुळं बारामतीच्या आनंद सतीश लोखंडे लोखंडे याच्यापुढील अडचणी वाढणार आहेत.