माळेगाव साखर कारखान्यावर अजितदादांचं निर्विवाद वर्चस्व; 21 पैकी 20 उमेदवार आले निवडून; विरोधकांना केवळ एकाच जागेवर यश

माळेगाव साखर कारखान्यावर अजितदादांचं निर्विवाद वर्चस्व; 21 पैकी 20 उमेदवार आले निवडून; विरोधकांना केवळ एकाच जागेवर यश

 

बारामती:- संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा निकाल आता जाहीर झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली उभा करण्यात आलेल्या निळकंठेश्वर पॅनलला मोठी विजयी आघाडी मिळाली आहे. अजित पवारांच्या पॅनलचे 21 पैकी 20 उमेदवार विजयी झाले आहेत. जेष्ठ नेते शरद पवार आणि चंद्रराव तावरे यांच्या दोन्ही पॅनलला मोठा धक्का बसला असून शरद पवारांच्या पॅनलमधील सर्वच उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला आहे. तर चंद्रराव तावरे यांच्या पॅनलमधील ते स्वतःच फक्त निवडून आले आहेत.

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जेष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या गटाने बळीराजा सहकार पॅनल उभे केले होते. या पॅनलचे नेतृत्व युगेंद्र पवार हे करत होते मात्र या पॅनलमधील सर्वच उमेदवारांचा पराभव झाला आहे तर अजित पवारांनी उभ्या केलेल्या निळकंठेश्वर पॅनलचे 21 पैकी 20 उमेदवार निवडून आले असून चंद्रराव तावरे हे एकमेव विरोधी उमेदवार येथे निवडून आले आहेत. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः निवडणूक लढवत होते. ते ‘ब वर्ग’ गटातून सर्वप्रथम विजयी झाले.

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी चार पॅनल उभे होते. अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनल, शरद पवारांच्या नेतृत्वाखालील बळीराजा सहकार बचाव पॅनल, भाजप नेते चंद्रराव तावरे-रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि कष्टकरी शेतकरी समिती अपक्षांचे एक असे चार पॅनल रिंगणात होते. यात अजितदादा यांच्या पॅनलने एकतर्फी विजय मिळवला आहे.

निळकंठेश्वर पॅनलचे विजयी उमेदवार : ब वर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून रतनकुमार भोसले, इतर मागास प्रवर्गातून नितीन शेंडे, भटक्या विमुक्त जाती-जमाती प्रवर्गातून विलास देवकाते, महिला राखीवमधून संगीता कोकरे, ज्योती मुलमुले, माळेगाव गटातून बाळासाहेब तावरे, शिवराज जाधवराव, राजेंद्र बुरुंगले, पणदरे गटातून योगेश जगताप, तानाजी कोकरे, स्वप्नील जगताप, सांगवी गटातून गणपतराव खलाटे, विजय तावरे, खांडज-शिरवली गटातून प्रताप आटोळे, सतीश फाळके, निरावागज गटातून जयपाल देवकाते, अविनाश देवकाते आणि बारामती गटातून नितीन सातव, देवीदास गावडे