कत्तलीसाठी नेणारी जनावरे बऱ्हाणपूर जवळ पकडली - वाहन जप्त

कत्तलीसाठी नेणारी जनावरे बऱ्हाणपूर जवळ पकडली - वाहन जप्त

 

  • पोलिसांकडून तिघांचे विरोधात गुन्हा दाखल ; गोरक्षकांची कामगिरी

बारामती:- ट्रकमध्ये भरून अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी खुर्द, कोल्हार बुद्रुक परिसरातून ट्रकमध्ये भरून बारामतीत कत्तलीसाठी जनावरे आणली जात होती. गोरक्षकाच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या सहकार्याने हे वाहन बऱ्हाणपूर जवळ पकडण्यात आले आहे.      
      
याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी (दि.११ जून)ही कारवाई करण्यात आली.
        
ट्रकचालक नन्नू कालेसाब शेख(रा.समर्थनगर,गुणवडी रोड, बारामती), क्लिनर महंमद हुसेन शेख (रा.सरडे,ता.फलटण, जि. सातारा) व वसीम जब्बार कुरेशी (रा.म्हाडा कॉलनी शिवाजी चौक, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यां तिघांची नावे आहेत.     
       
याप्रकरणी पोलिसात अक्षय राजेंद्र कांचन (रा.उरुळी कांचन, ता.हवेली) या गोरक्षकाने फिर्याद दिली आहे.मानद पशुकल्याण अधिकारी ऋषिकेश कामठे यांना ही माहिती मिळाली होती.त्यांनी कांचन यांना ही माहिती दिली. ट्रक (एमएच ४२ एम ८२१४) मधून लोणी खुर्द,कोल्हार बुद्रुक परिसरातून ही जनावरे बारामती कडे आणली जात होती. गोरक्षक कांचन, आकाश लोंढे, अक्षय जाधव, आकाश लांडगे आदींनी बारामती नजीक बऱ्हाणपूर पोलिस उप मुख्यालयाजवळ हे वाहन थांबवले.वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये सहा जर्सी गायी जखडून बांधण्यात आल्या होत्या.जनावरांची कोणतीही वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नव्हती. गोरक्षकांनी ही माहिती बारामती तालुका पोलि सांना दिली. त्यांनी तेथे येत वाहनातून २ लाख ४० हजार रुपये किमतीच्या जर्सी गायी तिघांकडून हस्तगत केल्या. तसेच या कारवाईत ५ लाख रुपयांचा ट्रकही जप्त करण्यात आला असून पोलिस पुढील अधिक तपास करीत आहेत.