बारामतीत व तालुक्यात पावसाच्या पुन्हां सरीवर सरी; बारामती शहर व तालुक्यात पावसाची पुन्हा जोरदार हजेरी

बारामतीत व तालुक्यात पावसाच्या पुन्हां सरीवर सरी; बारामती शहर व तालुक्यात पावसाची पुन्हा जोरदार हजेरी

 

बारामती:- उन्हाचा पारा सर्वत्र ३५-३६ अंशांवर असतांना, अंगाची लाहीलाही होत असतानाच ऐन मे महिन्यात, महिना अखेरीस सलग पाच ते सहा दिवस झालेल्या अतिवृष्टी नंतर थांबलेला पाऊस बारामती परिसरात पुन्हा सक्रिय झाला आहे. चार पाच दिवस बारामती तालुक्यासह लगतच्या तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. गुरुवार,शुक्रवार पासून दोनचार दिवस सायंकाळच्या सुमारास बारामती शहर व "तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली.या पावसामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले.      

     मे महिन्याच्या अखेरीस बारामती शहर व तालुका तसेच लगतच्या तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले.या दरम्यान पिंपळी लिमटेक परिसरातील नीरा डावा कालवा फुटल्याने, या परिसरातील अनेकांच्या घरात पाणी जाऊन घरातील साहित्यासह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. बारामती शहरातील तब्बल सत्तरहून अधिक नागरिकांच्या घरात या पावसाचे पाणी शिरले होते,तसेच शहराचे सूर्यनगरी भागातील दोन इमारती खचल्या आहेत.

बारामती व इंदापूर तालुक्यात अनेकांचे घरात शिरले पाणी

 आकस्मिक मे महिन्यातील अवकाळी पावसाने बारामती शहर व तालुक्यात मोठेच नुकसान झाले.अनेक भागात,घरात पाणी शिरून  नुकसान झाले. बारामतीत नगरपरिषदेने तातडीची मदत करत क्षतिग्रस्त लोकांची काहीकाळ निवारा व भोजन व्यवस्था केली,पालकमंत्री अजित पवार यांनी शासन स्तरावर आर्थिक मदत केली.

    इंदापूर तालुक्यातील सणसर, कुरवलीसह इतरही गावांमध्ये अनेकांच्या घरात पाणी गेल्याने त्या ठिकाणी देखील नुकसान झाले असून शासनाने योग्य ती आवश्यक मदत केली आहे.मे महिन्यातच पावसाने सरासरी ओलांडल्याने शेतीचे मोठेच नुकसान झाले आहे.सदर परिस्थिती पूर्वपदावर येत असताना पुन्हा चार दिवसांपासून बारामती शहर व तालुक्यात पाऊस सक्रिय झाला आहे.

शेतकऱ्यांची खरिपाच्या पेरण्यासाठी तयारी सुरू

    दरम्यान जिरायती भागातील खरिपाच्या पेरण्यासाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू झाली आहे, त्यातच पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची शेतातील कामे खोळंबली आहेत. दरम्यान नीरा व कऱ्हा या नद्यांना देखील मे महिन्याचे अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर आला होता. सध्या या दोन्हीही नद्या वाहत आहेत. तालुक्यातील सर्व विहिरी पाण्याने भरून वाहत आहेत. बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या पावसामुळे मिटलेला आहे.

        मात्र पावसाने या पुढेही संततधार सुरूच ठेवल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक व जमिनीचे नुकसान होऊन पुनर्पिके  घ्यावी लागण्याची शक्यता दिसत आहे.