
निवडणुकीसाठी पार पडल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुरुशिष्यांवर जोरदार टीका तसेच ४२५ कोटींच्या कर्जाचा विरोधकांचा आरोप धादांत खोटा असा टोला
बारामती:- विरोधक माळेगांव कारखान्यावर सत्ताधाऱ्यांमुळे ४२५ कोटींचे कर्ज असल्याचे धादांत खोटे बोलतात. 39 मे अखेर आपल्याकडे २६९ कोटींची ७ लाख १२ हजार ४११ क्विंटल साखर शिल्लक आहे. बँकेची २२९ कोटी कर्ज फेड करून उपलब्ध होणारी रक्कम ४० कोटी रुपये आहे. यामध्ये इथेनॉल पैसे वेगळे होतात, अशी परिस्थिती असताना विरोधक धादांत खोटे बोलतात, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.
माळेगाव कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार यांनी गुरुशिष्यांवर जोरदार टीका केली. पवार म्हणाले, माळेगांव कारखान्याच्या साखरेवर २२९ कोटींचे कर्ज आहे, तर २६९ कोटींची साखर शिल्लक आहे. त्यामुळे साखर विक्रीतून कर्ज वजा जाता ४० कोटी रुपये शिल्लक उरणार आहेत. कारखान्याने एफआरपी पेक्षा अधिक म्हणजे ३३३२ रुपये सर्वाधिक दर दिला. अजूनपर्यंत महाराष्ट्रात कोणी दिलेला नाही.
मात्र, कारण नसताना विरोधक 'बाऊ' करून सभासदांची दिशाभूल करतात. विरोधकांच्या काळात ऊस गाळप सुरू असताना उसाचा साखर उतारा १०,६१ होता, कारखान्यात ज्यूसमधून गळती होती. कारखाना आमच्या ताब्यात आल्यानंतर आम्ही तिथे 'व्हीएसआय'ची टीम पाठवून अभ्यास करून होणारी रसाची गळती थांबविली. त्यानंतर आमच्या काळात साखर उतारा ११.४७ झाला. चांगल्या पद्धतीने आमच्या लोकांनी कारखाना चालविल्याचे पवार म्हणाले.
आठ टक्क्यांनी ऐच्छिक ठेव पतसंस्थेने ठेवल्यास बचत
विरोधकांनी पतसंस्थेतून पैसे काढल्याचा केलेला आरोप खोटा आहे. पतसंस्थेतून १ रुपयादेखील काढलेला नाही. आपल्या फार पूर्वीपासून कारखान्यात आठ टक्के व्याजाने ऐच्छिक ठेवी ठेवतात. बँकेचा व्याजदर १०.३० ते ११ टक्के आहे. यामध्ये तीन टक्के बचत होत असेल आणि काहींनी आठ टक्के व्याजाने ऐच्छिक ठेव ठेवल्यास यामध्ये काय तोटा आहे. ११ टक्क्यांनी बँकेचे पैसे घेण्यापेक्षा आठ टक्क्यांनी ऐच्छिक ठेव पतसंस्थेने ठेवल्यास काहीच बिघडले नाही, यामध्ये कारखान्याची बचतच होत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.