विरोधकांनी आपल्या पॅनेलचे चेअरमन जाहीर करावेत - उपमुख्यमंत्री अजित पवार

विरोधकांनी आपल्या पॅनेलचे चेअरमन जाहीर करावेत - उपमुख्यमंत्री अजित पवार

 

माळेगाव निवडणुकीत अजितदादांचे आव्हान

बारामती :-  जवळपास १९ हजार ७०० ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या प्रपंचाचा प्रश्न असल्याने मी चेअरमनपदाची उमेदवारी जाहीर केली ; पण त्यामुळे विरोधकांच्या पोटात कां दुखतंय ? असा सवाल करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांनी आपापल्या पॅनेलचे चेअरमन जाहीर करावेत,असे माळेगाव निवडणूक प्रचार सभेत बोलताना आव्हान दिले.

 

                           

        अजित पवार म्हणाले, माळेगाव साखर कारखान्याची स्थापना १९५५ मध्ये झाली. आज जवळपास ७० वर्षांचा काळ लोटला आहे.कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांच्या कुटुंबाचा, त्यांच्या प्रपंचाचा प्रश्न आहे.मला साखर कारखानदारी तला मोठा अनुभव आहे.मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्याने माझ्या शब्दाला वजन आहे. बारामती तालुक्याच्या विकासाचा झंजावात आपण पाहिला आहे.माझ्या अधिपत्या खाली असलेला सोमेश्वर साखर कारखाना काही वर्षांपूर्वी अडचणीत होता,परंतु आज तोच कारखाना आता राज्यातउच्चांकी ऊस दर देणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. त्याच पद्धतीने माळेगावचा नावलौकिक राज्यात मोठा आहे. आपल्या सत्ताधारी संचालकांनी मागील पाच वर्षांत सातत्याने उच्चांकी ऊस दर दिला आहे,असे असतांना विरोधक चुकीच्या पद्धतीने आरोप करून कारखान्यावर कर्ज असल्याचा अपप्रचार करतात ; मात्र जर कर्ज असते तर राज्यातील खासगी आणि सहकारी अशा जवळपास २०० साखर कारखान्यांपेक्षा मागील गाळप हंगामाच्या उसाच्या उचलीपोटी माळेगावने सर्वात जास्त ॲडव्हान्स दिला आहे,अजून फायनल पेमेंट दिले नाही..
       तुम्ही जर माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत माझ्या विचाराचे पॅनेल निवडून दिले,तर मी कोणत्याही भ्रष्टाचाराला थारा न देता, काटकसरीने कारखाना चालवून दाखविन.माझ्या कामाची पद्धत तुम्हाला माहिती आहे.मी शब्दाचा पक्का आहे. दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून माझी ख्याती आहे.माळेगाव साखर कारखान्याच्या परिसराचा विकास करून चेहरामोहरा बदलणार आहे.त्यासाठी सभासदांच्या पैशाला हात न लावता केंद्र, राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच आमदार फंडातून,डीपीडीसी,सीएसआर आदींच्या माध्यमातून निधी आणण्याची धमक माझ्यामध्ये आहे.मी जवळपास ७ लाख २० हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. फक्त माळेगाव कारखान्याच्या बाबतीत माझा तुमचा संबंध येणार आहे असे समजू नका.मी तुमचा आमदार व पालकमंत्री देखील आहे. त्यामुळे नोकरी, बदली,पोलिस ठाणे,महसूल आदींबाबत मी तुम्हाला मदत करू शकतो, तसेच गावाच्या सामाजिक विकासासाठी माझी तुम्हाला मदत राहील,असे पवार यांनी सांगितले.
     आपल्याला निरा नदी स्वच्छ ठेवायची आहे.त्यादृष्टीने झिरो डिस्चार्ज बाबत प्रयत्न करणार आहे.केंद्र तसेच राज्य शासनाच्या बदलत्या धोरणानुसार कांही निर्णय घ्यावे लागतात. माझे केंद्रातील तसेच राज्यातील मंत्र्यांशी चांगले संबंध आहेत. राज्याचे कृषिमंत्री माझ्या पक्षाचे आहेत.असे असतांना तुम्हाला एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमा तून जास्तीचे ऊस उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
      माळेगाव कारखान्याच्या  कार्यक्षेत्रातील ३७ गावांतील लोकांच्या प्रपंचाचा प्रश्न असल्यामुळे आपण विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता आपल्याला जास्तीचा ऊस दर तसेच इतर मदत कोण करेल याचा विचार करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

वय झाल्यावर थांबायचं असतं
   निसर्गाचा नियम आहे, वय झाल्यानंतर शारीरिक तसेच मानसिक क्षमतेत बदल घडतो, थकवा जाणवतो अशावेळी कार्यक्षमता कमी होते,परंतु कांही लोक वयाचा विचार न करता केवळ स्वार्थासाठी हट्टाने उभे आहेत,अशी टीका चंद्रराव तावरे यांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

आपल्या सर्वांच्या सहकार्याने जर मी माळेगाव कारखान्याचा चेअरमन झालो तर माझ्या कामाच्या पद्धती नुसार मी सकाळी सात वाजताच संचालकांची मीटिंग घेईल. त्यामुळे त्यांना देखील लवकर उठून काम करण्याची सवय लागेल.तसे कोणालाही गाडी,नाश्ता,जेवण इतर अनावश्यक खर्च करू देणार नाही.
-अजित पवार उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य