
पुणे जिल्ह्यातील 'या' भागात ३१ ऑगस्टपर्यंत पर्यटनस्थळ परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
पुणे:- जिल्ह्यातील लोणावळा परिसरातील तसेच मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे आदी ठिकाणी वर्षाविहार, पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी पर्यटनस्थळ परिसरात ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
लोणावळा परिसरातील एकविरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना धरण या परिसरात प्रामुख्याने पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. अशावेळी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सदर ठिकाणांच्या अनुषंगाने हे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे व पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, थोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करण्यास प्रतिबंध राहील.