
स्वच्छ सर्वेक्षण २०२४ स्पर्धेमध्ये इंदापूरची नगरपरिषद प्रथम!
दरम्यान राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, माजी
मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी नगराध्यक्षा सौ. अंकिता मुकुंद शहा, माजी
नगराध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, कृष्णा ताटे, अरविंद
वाघ यांनी इंदापूर नगरपरिषदेचे अभिनंदन केले.
कचरामुक्त शहर मानांकनामध्ये इंदापूर नगरपरिषदेस थ्री स्टार मानांकन तसेच ओडीएफ डबल प्लस मानांकन प्राप्त होऊन इतिहास निर्माण झाला आहे. स्वच्छ सर्वेक्षण मानांकन मध्ये घरोघरी कचरा संकलन, कचरा विलगीकरण, कचरा प्रक्रिया, कचरा तक्रारींचे निवारण सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, व्यावसायिक रहिवासी व मार्केट क्षेत्र स्वच्छता, जलस्त्रोत, सार्वजनिक शौचालय स्वच्छता तसेच स्वच्छता, सेवा, कोंडाळेमुक्त रस्ते व ब्लॅक स्पॉट सुशोभीकरण आदींचा विचार करण्यात आला आहे.
इंदापूर शहराची स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत आजअखेरची ही सर्वोत्तम
कामगिरी आहे. यावेळी कर्मचाऱ्यांनी फटाके वाजवत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष
साजरा केला. यावेळी इंदापूर नगरपरिषद मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी
कर्मचाऱ्यांचे गुणगौरव करून हा सन्मान फक्त इंदापूर नगरपरिषदेचा नव्हे, तर
संपूर्ण इंदापूर शहराच्या नागरिकांचा विशेष सन्मान आहे. आपल्या शहराने
दाखवलेली जागरूकता, नागरिकांचा स्वच्छतेसाठी सहभाग आणि कर्मचाऱ्यांनी
केलेले प्रामाणिक श्रम यामुळे हे शक्य झाले आहे. आपण यापुढेही स्वच्छता हीच
सेवा मानून शाश्वत शहरांकडे वाटचाल करत इंदापूर शहराची प्रगती करण्या साठी
कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया ढगे यांनी व्यक्त केली.
दरम्यान नगरपरिषदेच्या मावळत्या नगराध्यक्षा सौ. अंकिता मुकुंद शहा यांच्या कारकीर्दीत शहराने स्वच्छतेतून समृद्धी केंद्रबिंदू मानून स्वच्छता अभियानात भाग घेऊन देश पातळीवर इंदापूर शहराचा नावलौकिक उंचावला. त्यांच्या कारकिर्दीत सलग पाच वेळा नगरपरिषदेने ही कामगिरी उंचावत नेली. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नगरपरिषद मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने काम करत सहाव्या वर्षी नगरपरिषदेस प्रथम क्रमांक मिळवून देत शहराचा मानसन्मान उंचावला असल्याची प्रतिक्रिया माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते हमीद आतार, महादेव चव्हाण, प्रशांत सिताप, पांडुरंग शिंदे, शेखर पाटील, गोरख शिंदे, सुनील अरगडे यांनी नगरपरिषदेचे विशेष कौतुक केले.