उसाच्या पिकावर लोकरी मावाचा प्रादुर्भाव

उसाच्या पिकावर लोकरी मावाचा प्रादुर्भाव

 

काटेवाडी:- इंदापूर आणि बारामती तालुक्यातील काही भागांमध्ये जुलै महिन्यात पावसाळ्याच्या मध्यातच उसाच्या पिकावर लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. रस शोषण करणारी कीड ऊस, ज्वारी आणि बाजरी या पिकांवर उपजीविका करते. साधारणपणे पावसाळा संपल्यानंतर, म्हणजेच ऑक्टोबरपासून उन्हाळ्यापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसतो. परंतु, यंदा बदलत्या हवामानामुळे आणि अनियमित पावसामुळे जुलैमध्येच या किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. या किडीमुळे उत्पादनात सुमारे वीस टक्के होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

लोकरी मावा किडीची पिल्ले आणि प्रौढ अवस्था पिकाला सर्वाधिक नुकसान पोहोचवते. ही कीड पानाच्या खालच्या बाजूस राहून रस शोषते, ज्यामुळे पाने पिवळी पडतात, वाळतात आणि ठिसूळ होतात. किडीमुळे मधासारखा चिकट द्रव बाहेर पडतो, ज्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया बाधित होऊन पिकाचे नुकसान होते. इंदापूर आणि बारामती परिसरात खोडवा पिकावर या किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसत आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील उसाची नियमित पाहणी करावी. किडीची सुरुवातीची लक्षणे, जसे की पानांवर पिवळे ठिपके किंवा काळी बुरशी, दिसल्यास तत्काळ उपाययोजना करावी. स्थानिक कृषी विभाग किंवा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य नियंत्रण पद्धतींचा अवलंब करावा.

एकात्मिक कीड व्यवस्थापन....
शेतकऱ्यांनी या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती अवलंबावी. खालील उपाययोजना प्रभावी ठरू शकतात:
प्रतिबंधात्मक उपाय: बाधित शेतातील बेणे लागवडीसाठी वापरू नये. प्रादुर्भावग्रस्त पाने आणि पाचट काढून जाळावे.
जैविक नियंत्रण: डीफा ॲफिडिव्होरा (हजार अळ्या/हेक्टर), मायक्रोमस इगोरोटस (दोन हजार पाचशे अळ्या/हेक्टर) किंवा क्रायसोपर्ला कार्निया (दोन हजार पाचशे अंडी/हेक्टर) यांसारख्या मित्र कीटकांचा वापर करावा.
रासायनिक नियंत्रण: किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास डायमिथोएट (तीस टक्के ईसी, दीड मिलि/लिटर पाणी) स्टिकरसह मिसळून फवारणी करावी.

ढगाळ हवा‌मान, तुरळक ठिकाणी हलका पाऊस, अधून मधून पड‌णारे ऊन यामुळे आपल्या भागात तुरळक ठिकाणी मधुनी पडणारे रीनानायामा किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतातील पाण्याचा निचरा करावा. लागवडीसाठी रोगग्रस्त शेतातील ऊस वापरू नये.
- वाय. जे. सांगळे, सहाय्यक कृषी अधिकारी, काटेवाडी