सोलापूर शहरात रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत पोलिसांची गस्त!

सोलापूर शहरात रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत पोलिसांची गस्त!

 

सोलापूर : सोलापूर शहराचा विस्तार वाढला, अनेक नवीन नगरे निर्माण झाली. सोलापूर शहरातील अडीच लाख कुटुंबांपैकी अंदाजे सव्वा ते दीड लाख कुटुंबांच्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत. चालू वर्षात सोलापूर शहरात जानेवारी ते जून या काळात २७३ चोऱ्या आणि ५१ घरफोड्या झाल्या आहेत. घर बंद असले की त्याठिकाणी चोरी होतेच, असे अनुभव अनेकांना आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता शहर पोलिसांनी रात्रगस्त वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ही रात्रगस्त असणार आहे.

सोलापूर शहरातील ज्या भागात, नगरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कमी आहेत, चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे, अशी ठिकाणे पोलिसांनी निश्चित केली आहेत. याशिवाय नागरिकांच्या मागणीनुसार देखील त्या परिसरात पोलिस रात्रगस्त घालणार आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे (डीबी पथक) अंमलदार साध्या वेशात रात्रगस्त घालतील.

चोरी, घरफोडीसह अन्य गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी पोलिस आयुक्त एम राज कुमार यांनी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील संवेदनशील ठिकाणी प्रभारी अधिकाऱ्यांनी रात्री आठनंतर पायी गस्त घालावी, असेही आदेश दिले आहेत. एकूणच रात्रगस्त वाढविण्यात आल्याने आगामी काळात शहरातील घरफोडी, चोरीचे प्रमाण कमी होईल, अशी आशा आहे. नागरिकांनीही स्वत:च्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे घरासमोर लावावेत, अशी पोलिसांची अपेक्षा आहे.

रात्रगस्त वाढविली, नगरानगरांमध्ये पेट्रोलिंग

पोलिस आयुक्त व उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरातील चोरी, घरफोडीचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी झाले असून गुन्हे उघड होण्याचे प्रमाण वाढले आहे. चोरी, घरफोडी होऊ नये म्हणून प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री ८ ते १० दरम्यान पायी पेट्रोलिंग, रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत रात्रगस्त आणि पाचनंतर गुड मॉर्निंग पेट्रोलिंग राहणार आहे.

- राजन माने, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

रात्रगस्तीवर राहणार वरिष्ठांचा वॉच

संपूर्ण शहरातील रात्रगस्तीवर सहायक पोलिस निरीक्षक किंवा वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे लक्ष राहील. रात्रगस्तीसाठी विभाग-१ व विभाग-२ अंतर्गत दोन पोलिस निरीक्षक, पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक आणि बीट मार्शल असतील. याशिवाय पेट्रोलिंगसाठी ‘डायल ११२’च्या, गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या व वाहतूक शाखेच्या गाड्या देखील असणार आहेत. दररोज या सर्वांना रात्री कोठे गस्त घातली, याची माहिती वरिष्ठांना द्यावी लागते.