...तर धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदाची संधी देऊ'' : अजित पवार

...तर धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदाची संधी देऊ'' : अजित पवार

 


मुंबई:- कृषी विभागातील घोटाळ्यामध्ये क्लिन चीट मिळाल्यानंतर धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एकप्रकारे त्यांनी भविष्यात मुंडेंना मंत्रिपद देण्याचे संकेत दिले आहेत.

अजित पवार हे पुण्यातून बोलत होते. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, कृषी विभागाच्या घोटाळ्यामध्ये धनंजय मुंडेंचा कुठेही दोष आढळेला नाही. त्यामुळेच न्यायालयाने त्यांना क्लिनचीट दिली आहे. जी काही बदनामी व्हायची होती, ती झाली. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्यांची बदनामी झाली. आता अजून एक त्यांच्यासंदर्भातली गोष्ट आहे. त्याबद्दलही पोलिस यंत्रणा कार्यवाही करीत आहे.

''कृषीच्या बाबतीत त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत, त्याबाबत न्यायालयाने निकाल दिला आहे. ज्यांनी याचिका केली त्यांनाही एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. आपल्याकडे न्याय व्यवस्था ही सर्वोच्च आहे.'' असं अजित पवार म्हणाले.

धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदाची संधी देणार का? या प्रश्नाच्या उत्तरात अजित पवार म्हणाले की, त्यांच्याबाबत अजून एका गोष्टीसंदर्भात आम्ही माहिती घेत आहोत. त्याची न्यायालयीन चौकशी चालू आहे. ती चौकशी झाल्यानंतर वस्तूस्थिती पुढे येईल. अशाच पद्धतीने त्याच्यात त्यांचा दुरान्वयेही संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ.

असं म्हणत अजित पवारांनी एकप्रकारे भविष्यात धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचे संकेत दिले आहेत. संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा उजवा हात होता, त्यांच्याच जगमित्र कार्यालयातून त्याने अनेक कारनामे केले होते. त्यामुळे मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.