
खुनाचा प्रयत्न; दहा वर्षांची सक्तमजुरी, लिंगाळी येथील घटना
बारामती: खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी सोनू नामदेव शेटे (वय 35, रा. जगदाळेवस्ती, लिंगाळी, ता. दौंड) याला 10 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
रोहित रवींद्र कांबळे (रा. लिंगाळी, ता. दौंड) यांच्यावर खुनी हल्ला केल्याचा आरोप शेटेवर होता. या प्रकरणात शेटेला 10 वर्षांची सक्तमजुरी व 20 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास तसेच भारतीय शस्त्र अधिनियमानुसार दोन वर्षे सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, अशी शिक्षा न्या. पाटील यांनी सुनावली.
भाड्याने दिलेल्या स्विफ्ट मोटारीच्या बिलावरून शिंदे-शेटे यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यातूनच 22 ऑक्टोबर 2019 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास खवटे हॉस्पिटल दौंड येथे रोहित व त्यांचा भाऊ सुमीत हे दोघे दुचाकीवरून जात असताना सोनू शेटेने डाव्या मांडीत व पाठीत गोळी मारून रोहितला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
शेटे याचा एक साथीदार पळून गेला होता. त्याअनुषंगाने दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी या प्रकरणाचा तपास करीत आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. प्रसन्न जोशी यांनी काम पाहिले. मुंबईच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील योगिता पटाईत यांची साक्ष या खटल्यात महत्त्वपूर्ण ठरली. त्यांनी गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा व रोहित कांबळे यांच्या शरीरातून काढलेली गोळी याचे विश्लेषण केले. अॅड. जोशी यांनी केलेला युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने शेटेला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.
या खटल्यात कोर्ट पैरवी अधिकारी नामदेव नलावडे, हवालदार मनीषा अहिवळे यांची सरकार पक्षाला मदत झाली.