सीएनजी ‘हायड्रो टेस्टिंग’चे दर तब्बल चारपट वाढले; चालकांमध्ये नाराजी, आंदोलनाचा इशारा

सीएनजी ‘हायड्रो टेस्टिंग’चे दर तब्बल चारपट वाढले; चालकांमध्ये नाराजी, आंदोलनाचा इशारा

 


1. पुण्यात सीएनजी वाहनांच्या हायड्रो टेस्टिंगचे दर ५००-७०० रुपयांवरून तब्बल २,८००-३,००० रुपयांपर्यंत वाढले आहेत.
2. या दरवाढीमुळे खासगी वाहनधारक आणि रिक्षाचालकांमध्ये तीव्र नाराजी असून आंदोलनाचा इशारा दिला गेला आहे.
3. सरकारने हस्तक्षेप केला नाही तर वाढलेला खर्च प्रवाशांच्या भाड्यावर टाकला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

राज्यासह पुणे शहरात सीएनजी वाहने चालवणाऱ्या रिक्षा चालकांसाठी आवश्यक असलेल्या हायड्रो तपासणीचे (टेस्टिंग) दर चार पटीने वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांमध्ये तसेच रिक्षा संघटनांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या दरवाढीवर तोडगा न निघाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सीएनजी वाहनांच्या ‘हायड्रो टेस्टिंग’चे शुल्क वितरकांनी अचानक वाढवून २,८०० ते ३,००० रुपये केले आहे. काही महिन्यांपूर्वी हेच शुल्क फक्त ५०० ते ७०० रुपये होते. या प्रचंड वाढीमुळे खासगी वाहनधारक आणि रिक्षाचालकांवर आर्थिक ताण आला आहे.

रिक्षा संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दर तीन वर्षांनी सुरक्षिततेसाठी आवश्यक असणाऱ्या या तपासणीच्या दरवाढीवर सरकारने तातडीने नियंत्रण आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे. वाढलेला खर्च रिक्षा-टॅक्सी भाड्यात वाढ करून प्रवाशांवर टाकला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्थेच्या (पीईएसओ) मार्गदर्शक सूचनांनुसार, सीएनजी वाहनांची‘हायड्रो टेस्टिंग’ ही दर तीन वर्षांनी अनिवार्य आहे. राज्यभरात एकच दर निश्चित केलेले असताना पुणे, मुंबई शहरांमध्ये वेगवेगळे दर आकारले जात आहेत. यापूर्वी ही तपासणी दर ५०० ते ७५० रुपये या दरात केली जात होती. परंतु, ३१ जानेवारीनंतर तपासणीसाठी चारपट रक्कम आकारली जात आहे. आता २८०० ते ३००० हजार रुपये इतका दर आकारला जात आहे. त्यामुळे खासगी सीएनजी वानधारकांसह रिक्षाचलाकांनाही आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.