
उजनी, वीर धरणांतून प्रचंड विसर्ग, भीमा-नीरा नदीकाठाला महापुराचा धोका
आज दुपारी ३ वाजताच्या अहवालानुसार, संगम येथून १ लाख २० हजार ६९५ क्युसेक्स, तर पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपात्रातून ६० हजार २४७ क्युसेक्स वेगाने पाणी वाहत आहे. पाण्याची आवक पाहता विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पाण्यामुळे पंढरपूर तालुक्यातील ८ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता असून, सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे. नदीकाठचे बंधारे पाण्याखाली जाताच वाहतुकीसाठी बंद करण्याचे निर्देश तलाठी, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांना देण्यात आले आहेत.
पंढरपूर नगरपालिका प्रशासन सज्ज
भीमा नदीच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेता, पंढरपूर नगरपालिका प्रशासन पूरस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. प्रशासनामार्फत उपजिल्हा रुग्णालयातील रायगड भवन येथे सुमारे एक हजार नागरिकांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे.
बाधित होणाऱ्या नागरिकांना त्यांचे जीवनावश्यक साहित्य हलवण्यासाठी नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थलांतरित नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केली जाणार असल्याचेही मुख्याधिकारी रोकडे यांनी सांगितले.