भारतीयांनो! असा बहिष्कार टाका की अमेरिकेत महागाईचा आगडोंब उसळला पाहिजे; ट्रम्प टॅरिफवर रामदेवबाबांची प्रतिक्रिया
अमेरिकेनं भारतावर ५० टक्के टॅरिफ लागू केल्यानंतर देशभरातून विरोध व्यक्त केला जात आहे. योगगुरु रामदेव बाबा यांनीही यावर प्रतिक्रिया दिलीय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात केल्या जाणाऱ्या मालावर तब्बल ५० टक्के टॅरिफ लागू केला आहे.
यामुळे भारतातील अनेक उद्योगांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. रामदेव बाबा म्हणाले की, भारतीय नागरिकांनी अमेरिकेनं लावलेल्या ५० टक्के टॅरिफचा विरोध केला पाहिजे. अमेरिकेची ही राजकीय गुंडगिरी आणि हुकुमशाही आहे.
अमेरिकन कंपन्या आणि ब्रँडवर पूर्णपणे बहिष्कार टाकला पाहिजे. कोणत्याही भारतीयाने पेप्सी, कोका-कोला, सबवे, केएफसी, मॅकडोनल्डस या दुकानांमध्ये जाऊ नये असंही रामदेवबाबांनी म्हटलंय. अमेरिकेवर इतका मोठा बहिष्कार टाका की अमेरिकेत हाहाकार उडाला पाहिजे. तिथं इतकी महागाई वाढली पाहिजे की ट्रम्पना स्वत:च टॅरिफ मागे घ्यायला लागला पाहिजे. भारताविरोधात जाऊन ट्रम्पनी मोठी चूक केलीय असं रामदेवबाबा म्हणाले.
अमेरिकेच्या निर्णयाचा भारताला फटका
अमेरिकेनं लागू केलेल्या टॅरिफमुळे भारतीय निर्यातदार अडचणीत आले आहेत. त्यांना अर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. भारताच्या कापडावर अमेरिकेत आता तब्बल ५१ टक्के आयात शुल्क लागणार आहे. यामुळे निर्यात कमी होऊन कापड उद्योगाला फटका बसणार आहे.
कोळंबी, हिरे, सोन्याचे दागिने, चामड्याच्या वस्तू, फळं, भाजीपाला या उद्योगांवरही परिणामाची शक्यता आहे. लाखो लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळू शकते. भारतानं २०२४-२५ या आर्थिक वर्षात ८ हजार ६५० कोटी डॉलर्सची निर्यात केली. मात्र येत्या आर्थिक वर्षात यात तब्बल २५ ते ३० टक्के घसरण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.