
नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज शुभारंभ
विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडणाऱ्या नागपूर (अजनी ) ते पुणे जंक्शन दरम्यान वंदे भारत एक्सप्रेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करतील. बेळगाव- बंगळुरु आणि अमृतसर ते श्रीमाता वैष्णौदेवी कटारा या दोन मार्गांवर देखील वंदे भारत एक्स्प्रेस शुभारंभ होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकमधून तीन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.
गाडी क्रमांक २६१०१ अजनी (नागपूर) –पुणे वंदे भारत एक्स्प्रेस ही ८८१ किमी अंतर कापणारी देशातील सर्वात लांब पल्ल्याची गाडी असेल. ही विदर्भातील चौथी वंदे भारत एक्सप्रेस आहे. या एक्सप्रेसला वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, आहिल्यानगर, दौंड येथे थांबे असतील.
ही एक्सप्रेस ११ ऑगस्टपासून मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस सकाळी ६.२५ वाजता पुणे येथून सुटून संध्याकाळी ६.२५ वाजता अजनी येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक २६१०२ अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस १२ ऑगस्टपासून आठवड्यातून सहा दिवस (सोमवार वगळता) सकाळी ९.५० वाजता अजनी येथून सुटून रात्री ९.५० वाजता पुणे येथे पोहोचणार आहे.या वंदे भारत एक्सप्रेसला एकूण ८ डबे असून एक एक्झिक्युटिव्ह चेअर कार, सात चेअर कार अशी एकूण ५९० प्रवासी क्षमता इतकी असणार आहे.