श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दोन लाख भाविकांची गर्दी
भीमाशंकर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दुसर्या श्रावण सोमवारी सुमारे दोन लाख भाविकांनी ‘जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय’ अशा घोषणा देत पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. यानिमित्त शिवलिंगावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सोमवारी (दि. 4) सकाळी आमदार महेशदादा लांडगे यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे.
मागील 15 दिवसांपासून या परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने निसर्गसौंदर्य खुलले आहे. धबधबे खळखळून वाहत असून, निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आणि पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येथे येत आहेत. शनिवार व रविवारीदेखील गर्दीचा महापूर उसळला होता. सुमारे चार ते पाच लाख भाविकांनी दर्शनासह पर्यटनाचा लाभ घेतला.
यातच पावसामुळे भीमाशंकर परिसराचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. यामुळे भाविक आणि पर्यटक डिंभे धरण, गोहे घाट यासह विविध ठिकाणी थांबून निसर्गाचा आनंद लुटत आहेत. वाहतूक व्यवस्थित राहावी, यासाठी प्रशासनाने पाच वाहनतळांची व्यवस्था केली होती. तेथून एसटीच्या गाड्या भाविक-भक्तांची वाहतूक करत होत्या. वाहतूक नियंत्रक मारुती खळदकर, घोडेगाव सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार व देवस्थान व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे, गोरख कौदरे यात्रेचे नियोजन करीत होते. कोकणातून शिडीघाट, गणपतीघाट, बैलघाटाने मोठ्या संख्येने भाविक येत होते.
खेड उपविभागीय पोलिस विभागांतर्गत घोडेगाव आणि खेड पोलिस ठाण्यांसह जिल्ह्यातून पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, 25 सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, 160 पुरुष व 40 महिला पोलिस कर्मचारी, एक आरसीपी पथक, 34 होमगार्ड आणि श्वान पथकाचा यात समावेश होता.