यवतमध्ये तणावपूर्ण शांतता; १५ जणांना ५ दिवसांची पोलिस कोठडी
यवत: दौंड तालुक्यातील यवत येथे मंगळवारी (दि. 1 ऑगस्ट) एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती, त्यामुळे युवकांच्या जमावाने आक्रमक होत आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्या तरुणाच्या घराची, दोन प्रार्थनास्थळांची, वाहनांची तोडफोड करून एका बेकरीला आणि दुचाकींना आग लावून दिली होती. या घटना पाच ठिकाणी झाल्या होत्या, त्यामुळे दोन समाजांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यवत पोलिसांनी पाच जणांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री आणि शनिवारी दिवसभर दंगल घडविणार्या 15 जणांना अटक केली. या सर्वांना दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिल्याची माहिती पुणे ग्रामीणचे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी दिली.
यवतमध्ये सध्या निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण शांत असून, जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. पोलिस ड्रोन कॅमेर्यांच्या माध्यमातून गावातील नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. यवत गावातील तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिस पथकासह राज्य राखीव पोलिस दलाची एक कंपनी पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. परिस्थितीवर जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस हे पोलिस ठाण्यात ठाण मांडून लक्ष ठेवून आहेत.
जमावाच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या ठिकाणांचे पोलिस व महसूल विभागाच्या वतीने पंचनामे करण्यात आले आहेत. गावातील बाजारपेठेत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या माध्यमातून हल्ले करणार्यांची ओळख पटविण्याचे पोलिस प्रशासन काम करीत असून, आत्तापर्यंत 15 जणांना अटक केली असली, तरी आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
अटक केलेल्यांना शनिवारी सायंकाळी पाच वाजता दौंड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सर्व आरोपींची रवानगी दौंडमधील सबजेलमध्ये करण्यात आली आहे. सद्य परिस्थितीत यवत गावात शांतता असून, पुढील दोन दिवसांत यवत गावात जनजीवन पूर्वपदावर येईल, अशी आशा स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.