चालू एसटीत कोयता हल्ल्याने दहशत, महिला पडलेली बेशुद्ध; उपचारादरम्यान सोडले प्राण

चालू एसटीत कोयता हल्ल्याने दहशत, महिला पडलेली बेशुद्ध; उपचारादरम्यान सोडले प्राण

 

बारामती : बारामती-इंदापूर मार्गावरील एसटी बसमध्ये काटेवाडी येथे चालू बसमध्ये एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशावर कोयत्याने सपासप वार करून दहशत माजवली होती. या घटनेत एक महिला बेशुद्ध पडली. त्या महिलेचा आज दुर्दैवी अंत झाला आहे. वर्षा रामचंद्र भोसले असे महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे, हल्लेखोराने स्वतःवरही कोयत्याने वार करून स्वतःला जखमी केल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये आरोपी अविनाश सगर (वय 22) वर्षे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बारामती-इंदापूर रोडवर काटेवाडी येथे शुक्रवारी ही घटना घडली होती. बस काटेवाडी येथे थांबली असताना हा प्रकार घडला. सगर याने अचानक कोयता काढून पवन गायकवाड यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर स्वतःवरही हल्ला केला. या घटनेने बसमधील प्रवासी घाबरले आणि एकच गोंधळ उडाला. जखमी प्रवाशाला तातडीने बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हल्लेखोरालाही वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. या घटनेने एकच गोंधळ उडाला होता.

या भयंकर घटनेमुळे बसमधील वर्षा रामचंद्र भोसले ही महिला प्रवासी धक्क्याने बेशुद्ध पडली होती. तिच्यावर बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र तिची प्रकृती खालावल्याने तिला पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज या महिलेचा मृत्यू झाला आहे. तिच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

बारामती आगाराची बस (क्र. एमएच १४ बीटी ३५०६) एक ऑगस्ट रोजी सकाळी ९:४५ वाजता बारामतीहून इंदापूरच्या दिशेने निघाली होती. काटेवाडी येथील उड्डाणपुलाजवळ बस आली असता अचानक एका प्रवाशाने कोयत्याने वार करत दहशत माजवली. या बसमध्ये सुमारे ६० प्रवासी प्रवास करत होते. मृत वर्षा भोसले या कामानिमित्त बारामतीवरून इंदापूरच्या दिशेकडे निघाल्या होत्या. पण या भयंकर घटनेमुळे ती बेशुद्ध पडली आणि आज तिचा अंत झाला आहे.