बारामती नगरपरिषद निवडणुकीचे नऊ वर्षांनी वाजले बिगुल

बारामती नगरपरिषद निवडणुकीचे नऊ वर्षांनी वाजले बिगुल

 

बारामती : तब्बल नऊ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर अखेर बारामती नगरपरिषदेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. सोमवारी (ता. 18) अधिकृत प्रभागरचना बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी जाहीर केली. यावर 31 ऑगस्ट पर्यंत सूचना व हरकती नोंदविण्यात येणार आहेत.

बारामती नगरपरिषदेची या अगोदरची निवडणूक 14 डिसेंबर 2016 रोजी झाली होती. या नगरपरिषदेची मुदत 18 फेब्रुवारी 2022 रोजी संपुष्टात आल्यानंतर तीन वर्षांचा कालावधी उलटूनही राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकाच झालेल्या नव्हत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर आता निवडणूकीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.

नऊ वर्षाच्या कालखंडानंतर निवडणूका होणार असल्याने पुन्हा एकदा बारामती नगरपरिषद कार्यक्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. अनेक इच्छुकांनी आता निवडणूका होणार असे दिसताच मोर्चेबांधणीस प्रारंभ केला आहे. आज प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर कोणत्या प्रभागातून आपण नशीब आजमावू शकतो याचीही चाचपणी सुरु झाली असून, पर्यायी प्रभागांचाही विचार इच्छुकांनी सुरु केला आहे.

बारामती नगरपरिषदेचे वीस प्रभाग असून यातून 41 नगरसेवक निवडून जाणार आहेत. 19 प्रभागात प्रत्येकी दोन नगरसेवक तर विसाव्या प्रभागातून तीन नगरसेवक निवडून जातील. या मध्ये पन्नास टक्के आरक्षण महिलांना असल्याने निम्म्या जागांवर महिला नगरसेविका निवडून जाणार आहेत. पुणे जिल्ह्यात बारामती ही एकमेव अ वर्ग नगरपरिषद असून सर्वाधिक नगरसेवक संख्या असलेली नगरपरिषद म्हणून ओळखली जाते.

दरम्यान, नगराध्यक्षपदाचे आरक्षण अजून निश्चित झालेले नसून नगराध्यक्षपदाचा सस्पेन्स कायमच आहे. तीन वर्षांहून अधिक काळ नगरपालिकेवर प्रशासकराज होते, त्या मुळे आता पुन्हा एकदा लोकनियुक्त नगरसेवकांच्या निवडीच्या प्रक्रीयेस निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार प्रारंभ झाला आहे. या नुसार सर्व प्रक्रिया पार पाडून 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान अंतिम केलेली प्रभागरचना प्रसिध्द होणार आहे. दिवाळीनंतरच नगरपरिषद निवडणूक होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.