बारामतीचा पीएमआरडीएमध्ये समावेश होणार यावर जवळपास शिक्कामोर्तब; आणखी वेगाने होणार विकास
पीएमआरडीएकडे हजारो कोटींच्या ठेवी आहेत. त्यामुळे विकासकामांसाठी पीएमआरडीएला शासनाच्या निधीवर अवलंबून राहावे लागत नाही. कार्यक्षेत्रातील विकासकामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे पीएमआरडीएमध्ये समावेश होणं ही बारामतीच्या दृष्टीने फायदेशीर बाब ठरणार आहे. पीएमआरडीएमध्ये समावेश झाल्यास येथील रस्त्यांचे जाळे, नागरीकरणाचे व्यवस्थापन यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार असून त्या माध्यमातून पीएमआरडीएच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.
बारामतीचा समावेश पीएमआरडीएमध्ये करावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार याबाबत पीएमआरडीएला सूचना देण्यात आल्या असून त्याबाबतचा अहवालही शासनाकडून मागवण्यात आला आहे. याबाबत शासन पातळीवर निर्णय झाल्यानंतर बारामतीच्या पीएमआरडीएतील समवेशावर शिक्कामोर्तब होणार आहे.