पावसाचा विचार करून गळीत शुभारंभाचा निर्णय - अजित पवार
माळेगाव- राज्यातील आगामी गळीत हंगाम आॅक्टोंबर की नोव्हेंबरामध्ये सुरू करायचा, एफआरपी एकरकमीचा मुद्दा, ऊस उत्पादन वाढीत एआय तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे धोरण, ऊस तोडणी मजूरांचा प्रश्न आदी साखर उद्योगातील महत्त्वाचे विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांसह आम्ही मंत्री समितीच्या बैठकीत (३० सप्टेंबर) मार्गी लावणार आहे.
अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावच्या वार्षिक सभेत स्पष्ट केली. याचवेळी त्यांनी मांडलेल्या ७१ कोटींच्या महत्वाकांक्षी सीबीजी गॅस प्रकल्प उभारण्याच्या विषयालाही माळेगावच्या सभासदांनी मान्यता दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले.
माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याची ७० वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, उपाध्यक्षा संगिता कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. तत्पुर्वी विरोधी गटाचे प्रमुख व माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी सीबीजी प्रकल्पाला आमचा विरोध नाही, मात्र स्वतंत्र विशेष सभा घ्यावी व सभासदांना समजून सांगवे, असे आवाहन सत्ताधाऱ्यांना केले.
परंतु अजित पवार यांनी हा प्रकल्प सर्वार्थाने फायद्याचा असून प्रतिटनाला अधिकचे पैसे तर मिळणार आहेच, शिवाय या प्रकल्पामुळे प्रदुषित पाण्याचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. १८ कोटींचे स्वभांडवल व ५५ कोटींचे पीडीसी बॅंकेचे कर्ज घेतले जाणार आहे.
त्यामुळे एका वर्षात होणारा हा ७१ कोटींचा नवीन प्रकल्प उभारण्यासाठी सभासदांनी मंजूरी द्यावी, असे प्रति आवाहन केले. त्याला उपस्थित सभासदांनी हात वर करून मान्यता दिली. या विषयावितेरिक्त साधकबाधक चर्चा करीत बहुमतांशी सभासदांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजूरी दिली.
पवार म्हणाले,` माळेगावची पंचवार्षिक निवडणूकीत चार महिन्यापुर्वी माझ्यावर जबाबदारी मोठ्या विश्वासाने दिली. तो विश्वास डोळ्यासमोर ठेवून माळेगावचा सर्वांगिण विकास साधणार आहे. सध्या माळेगावच्या कार्य़स्थळावरील १२ कोटींपेक्षा अधिक रकमेची रस्ते, काॅक्रीटीकरण आदी कामे वेगाने सुरू आहेत.
अर्थात हा निधी माळेगावच्या सभासदांचा नव्हे, तर सीएसआर फंड, राज्यसरकाराकडून उभा केला. याशिवाय एकरी ऊसाचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रायोगिक तत्वावर एआय तंत्रज्ञान प्रभावी राबवण्याचा निर्णय घेतला आहे. दैनंदिन कामकाजात व खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणली आहे.
तसेच साखर, वीज, इथेनॉल विक्री उच्चांकी करून यापुढील काळात सभासदांना सर्वाधिक ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवणार आहे. माळेगावचा नावलौकीक टिकण्यासाठी मी पाच वर्षे बांधिल आहे. दिवाळी अगोदर माळेगावचे प्रशासन सन २०२४-२५ चे अंतिम ऊस दर देईल. ``
शिवनगर शिक्षण संस्थेमधील गैर व्यवहारावर मात्र अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पवार म्हणाले,` या संस्थेचे अध्यक्ष पवारसाहेब आहेत. असे असताना येथे चुका झाल्या आहेत. हे मान्य करावे लागेल. या संस्थेवर नाहक तब्बल १५ कोटींचा बोजा वाढला आहे.
गरजेपेक्षा अधिक नोकरभरती, परवानगी न घेता इमारती उभारणे व दंडात्मक रक्कम शासनाला भरण्याची वेळ येणे, कर्मचार्यांचा भविष्य निर्वाह निधी न भरणे, अकाऊंट विभागात लाखो रूपयांचा गैर व्यवहार झाल्याने हा बोजा संस्थेला सोसावा लागत आहे. गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्यांवर पोलिस केस करण्याच्याही सूचना मी केल्या आहेत. शिवनगर संस्थेचा कारभार सुधारण्यासाठी यापुढे ठोस धोरणात्मक निर्णय घेणार आहे.`
तत्पूर्वी दशरथ राऊत यांनी शिवनगर संस्थेत गैरव्यवहार आणि अनियमितता चालू असल्याने आंदोलन केल्याचे सांगीतले. तत्कालीन अध्यक्ष,उपाध्यक्षांनी माझे ऐकले नाही म्हणून ही समस्या निर्माण राऊत यांनी सांगितले. गतवर्षी साखर विक्री प्रतिक्विटल ३६८० रुपये मिळाली असताना सभासदांना ३६३६ अंतिम ऊस दर मिळाला, तसे यंदा ३९०० रुपये साखर विक्री चालू असताना सभासदांना चार हजार मिळाले पाहिजेत,` अशी मागणी युवराज तावरे यांनी केली.
उत्पादन देणाऱ्या सीबीजी गॅस प्रकल्पाची व शासनस्तरावर अनुदानाची माहिती संचालक योगेश जगताप यांनी दिली. नीरा डावा कालवा कमकुवत ठिकाण वगळता सरसकट अस्तरिकरण नको असल्याचे विनोद जगताप यांनी सांगीतले.
ऊस दर मिळण्यासाठी केंद्र सरकारने एसएमपी वाढविली पाहिजे, इनकम टॅक्स माफ करणे व इथेनॉल दर वाढ धोरण राबविल्याने पंतप्रधान मोदी साहेबांचा फोटो अहवाल असला पाहिजे,पडीक सुतगिरणीचा वापर करणे, शिवनगरच्या गैर व्यवहार करणार्यांवर एफआयआर दाखल करावा, वाहतूक करार प्रक्रियेत झालेला भ्रष्टाचार, शिव व पानंद रस्ते झाल्याशिवाय ऊस उत्पादन वाढणार नाही.
एकरकमी एफआरपीचे धोरणामुळे कर्ज फेड वेळत होऊन आमचा अर्थिक फायदा होतो, नीरा नदीचे काळे पाणी बंद करा आदी मुद्दे अनेक सभासदांनी आक्रमकपणे मांडले. त्यामध्ये ज्ञानदेव बुरुंगले, अशोकराव तावरे, डी.डी.जगताप, अशोक जाधव, दिग्वीजय कोकरे, राजेंद्र देवकाते, सोपान देवकाते, विलास सस्ते, इंद्रसेन आटोळे, प्रकाश सोरटे, अरविंद बनसोडे आदीचा समावेश होता. कार्यकारी संचालक अशोक पाटील, जवाहर सस्ते यांनी अहवाल वाचन केले व प्रोसडींग पुर्ण केले.
चंद्रराव तावरे यांचा सत्ताधाऱ्यांना चिमटा...
माळेगावचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संचालक मंडळाने महत्वाकांक्षी सीबीजी गॅस प्रकल्प उभारण्याचे ठरविले आहे. त्याला आमचा विरोध नाही परंतु हा प्रकल्प फायद्याचा की तोट्याचा याविषयी सभासदांना विशेष सभेच्या माध्यमातून समजून सांगा.याशिवाय आजूबाजूचे साखर कारखान्यांची गाळप क्षमता मोठी झाली आहे.
त्या तुलनेत माळेगावचेही विस्तारिकरण करून गाळप क्षमता वाढवावी, इथेनॉल प्रकल्पही ५ लाख लिटर क्षमतेचा उभारावा, अशी सूचना माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी केली. यावेळी त्यांनी मागील संचालक मंडळाने साखरेचा कोठा वेळत विक्री केली नासल्याने, १४ कोटी ५५ लाख रूपयांचा व्याजाचा भुर्दंड सोसावला लागला, असाही चिमटा सत्ताधाऱ्यांना आपल्या भाषणाच्या घेताना तावरे विसरले नाही.
१०० टन उत्पादन घेणारे सन्मानार्थी सभासद...
संजय जगताप (सोनकसवाडी), प्रदीप जगताप (पणदरे), सुनिता जगताप (सोनकसवाडी), अभयसिंह घाडगे (मळद), सुरेखा जगताप (पणदरे), तेजस जगताप (पणदरे), रमेश गोफणे, विजय तावरे (माळेगाव), सुषमा महानवर (सोनकसवाडी), मंगेश सोलनकर (सोनकसवाडी), सुदाम देवकाते (निरावागज), सुमन जाधव (येळेगाव), शशांक जमदाडे (माळेगाव), अवधुत जमदाडे (माळेगाव), नुतन दोशी (पणदरे), रामचंद्र कोकरे (पणदरे), हणमंत देवकाते (निरावागज), अभिजित कोकरे (पवईमाळ), सर्जेराव कोकरे (पवईमाळ),विलास कोकरे (धुमाळवाडी),गणपत तावरे (माळेगाव), धर्मराज सोनटक्के (माळेगाव), शंकरराव देवकाते (निरावागज), प्रदीप जगताप (सोनकसवाडी), विद्यादेवी जगताप (भिकोबानगर), मच्छिंद्र तावरे (माळेगाव), रोहिणी पोंदकुले (खांडज), अमित जगताप (धुमाळवाडी), शिवाजी धायगुडे (माळेगाव), कृष्णदिप देवकाते (निरावागज), चंद्रकांत जाधव (माळेगाव).