राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार; निवडणूक आयोगाची अतिशय महत्वाची बैठक संपन्न
राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत ऑनलाइन बैठक घेऊन पूर्वतयारीचा आढावा घेतला. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व निवडणुका घेण्याचे निर्देश दिले असले, तरी आयोगाची तयारी पाहता निवडणुका नोव्हेंबरमध्येच पार पडू शकतात, असे संकेत मिळत आहेत.
निवडणूक आयोगाने प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. यानुसार, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची आरक्षण सोडत सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत काढली जाईल. नगरपालिका आणि नगरपंचायतींची अंतिम प्रभाग रचना २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान, तर महानगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना ८ ते १२ ऑक्टोबर दरम्यान जाहीर केली जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मतदान यंत्रांची (ईव्हीएम) उपलब्धता, मतदान केंद्रांची निश्चिती, अतिरिक्त मनुष्यबळाची गरज आणि ईव्हीएमच्या सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या वेगवान हालचालींमुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका आता लवकरच होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.