‘एमपीएससी’च्या पीएसआय मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, शारीरिक चाचणीसाठी हा आहे कट ऑफ

‘एमपीएससी’च्या पीएसआय मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, शारीरिक चाचणीसाठी हा आहे कट ऑफ

 

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने विविध परीक्षांच्या निकालात जाहीर होत आहेत. नुकताच राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. यामध्ये निकालाची टक्केवारी यावेळी वाढली होती. यातच महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ चा पोलीस उपनिरीक्षक पदाचा पदाच्या मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी सायंकाळी जाहीर झाला आहे. यानंतर विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणी होणार आहे. या निकालाचा कट ऑफमध्येही चांगलीच वाढ झाल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या शारीरिक चाचणीच्या आशांवर पाणी पडण्याची शक्यता आहे. ही परीक्षा २९ जून २०२५रोजी घेण्यात आली होती.

मुख्य परीक्षेत दोन पेपर होते आणि शारीरिक चाचणी तसेच मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचे वेळापत्रक लवकरच एमपीएससीच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. निकालानुसार, उमेदवार शारीरिक चाचणी आणि मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांची यादी, त्यांचे सीट नंबर आणि कटऑफ गुण एमपीएससीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे शारीरिक चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे. शारीरिक चाचणीसाठी निवडलेले उमेदवार पात्रता निकषांच्या पडताळणीच्या अधीन असतील.

एमपीएससीला कोणत्याही टप्प्यावर अपात्र आढळलेल्या उमेदवाराला अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे. निकाल परीक्षेशी संबंधित कोणत्याही चालू न्यायालयीन प्रकरणांच्या अधीन असेल. शारीरिक चाचणी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून घेतली जाईल, ज्याची माहिती लवकरच जाहीर केली जाईल. ज्या उमेदवारांना गुण पडताळणी करायची आहे, ते निकाल जाहीर झाल्यापासून १० दिवसांच्या आत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

पीएसआयच्या कट ऑफमध्येही वाढ

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी कट ऑफ गुण वेगवेगळ्या श्रेणी आणि उपश्रेणीनुसार बदलतात. कटऑफ गुण हे ओपन, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्लूएस, एसईबीसी आणि अनाथ श्रेणींसाठी तसेच प्रत्येक श्रेणीतील जनरल, महिला आणि खेळाडू उपश्रेणीनुसार उपलब्ध आहेत. कटऑफ गुणांची माहिती एमपीएससीच्या वेबसाइटवर तक्त्याच्या स्वरूपात दिली आहे. यामध्ये खुल्या वर्गातील मुलांचे गुण हे २९२.५० तर मुलींचे कट ऑफ गुण २७५.५० आहेत. तर ओबीस मुलांसाठी २७६ आणि मुलींसाठी २५५.५० एवढे कट ऑफ गुण आहेत. पुढील तक्त्यात सविस्तर कट ऑफ गुण पाहता येतील.