दौंडजमध्ये घरावर भरदिवसा दरोडा; गावकरी व पोलिसांनी केला पाठलाग; ड्रोनचा उपयोग करत पकडले चोरांना

दौंडजमध्ये घरावर भरदिवसा दरोडा; गावकरी व पोलिसांनी केला पाठलाग; ड्रोनचा उपयोग करत पकडले चोरांना

 

पुरंदर: पुरंदर तालुक्यातील दौंडज गावात शनिवारी दुपारी घडलेली घटना चित्रपटातील प्रसंगालाही लाजवेल अशी होती. भरदिवसा तीन चोरांनी घरात दरोडा टाकला आणि गावातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थ आणि पोलिसांनी मिळून दाखवलेली चातुर्यपूर्ण धावपळ अखेर चोरांना तुरुंगाच्या दारात घेऊन पोचली.

दरोड्यानंतर चोरांनी गावकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून थरकाप उडवला. तरीसुद्धा स्थानिक तरुणांनी हार न मानता जीवावर उदार होऊन त्यांच्या मागे धाव घेतली. नीरा जवळील थोपटेवाडी रेल्वे गेट बंद असल्याने चोरांची गाडी अडकली आणि तिथे पहिला थरार रंगला. यावेळी दोन चोर पळून गेले, तर चालकाला ग्रामस्थांनी पकडून ठेवले.

घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक वाकचौरे व पीएसआय सर्जेराव पुजारी आपल्या पथकासह घटनास्थळी धावले. दरम्यान पळालेले चोर पुणे–पंढरपूर मार्गावरील जेऊरजवळील उसाच्या शेतात जाऊन लपले. उंच उसामुळे त्यांचा ठाव लागणे जवळजवळ अशक्य होते.

या शेताला सुमारे दोनशे तरुणांनी वेढा घातला होता. पोलिसांनी कोणताही धोका न पत्करता तरुणांना उसात न शिरता फक्त राखण करण्याचे आदेश दिले. यानंतर आला खरा ‘ट्विस्ट’ – पोलिसांनी ड्रोन उडवला. ड्रोनच्या कॅमेऱ्यात चोरांचा ठाव लागला आणि लगेचच पोलिस व ग्रामस्थांनी एकत्रित झडप घालून त्यांना जेरबंद केले.

या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले. लखनसिंग रतपुतसिंग धुधानी (३५ वर्षे), बेहतसिंग शामसिंग कल्याणी (३० वर्षे), रत्नेश राजकुमार पुरी (२३ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. तिघेही छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरू असून उर्वरित साथीदारांचा शोध सुरू आहे.

या थरारक कारवाईत संदीप मदने, केशव जगताप, संदीप भापकर, विठ्ठल कदम, दशरथ बनसोडे, रविराज कोकरे, घनश्याम चव्हाण, प्रसाद कोळेकर यांसह शेकडो ग्रामस्थांनी धैर्याने सहभाग घेतला. यासंदर्भात प्रभारी अधिकारी दीपक वाकचौरे यांनी ग्रामस्थांच्या धाडसाचे कौतुक करताना म्हटले की, तरुणांनी पोलिसांना वेळेवर दिलेले सहकार्य आणि धैर्य यामुळेच या चोरांचा बंदोबस्त शक्य झाला. अशा प्रकारे लोकांचा पाठिंबा लाभला तर चोरीच्या घटनांवर सहज आळा घालता येईल.