
राज ठाकरे आज ‘मविआ’सोबत, निवडणूक आयोगाची भेट घेणार; आगामी युतीची नांदी?
मुंबई: महाविकास आघाडी व मनसेचं शिष्टमंडळ आज (१४ ऑक्टोबर) राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार आहे. राज्यातील विरोधी नेते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शकपणे पार पाडण्यासंदर्भात निवेदन देणार आहेत. दुसऱ्या बाजूला, पुण्यातील वाडिया महाविद्यालयात मनविसेच्या पोस्टरवरून अभाविप व मनविसे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी अमित ठाकरे आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात घेतलेले अनेक निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केल्याच्या चर्चेदरम्यान आता प्रहार जनशक्ती पार्टीसाठी दिलेली जागा जनता दल (सेक्युलर) या पक्षाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपा सरकारने या निर्णयासह माजी मंत्री बच्चू कडू यांना दणका दिला आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) आमदार संग्राम जगताप अडचणीत येण्याची शक्यता आहे. पक्षप्रमुख अजित पवार यांनी जगतापांना समन्स बजावलं असून बीडमधील मोर्चा सोडून मुंबईला येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी अशी मागणी भाजपा नेते रामदास तडस यांनी केली आहे. अजित पवार तीन टर्म या संघटनेचे अध्यक्ष असून या काळात महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याचा आरोपही तडस यांनी केला आहे.