नीलेश घायवळ पासपोर्टप्रकरणी अहिल्यानगरच्या दोन पोलिसांना पुणे पोलिसांची नोटीस

नीलेश घायवळ पासपोर्टप्रकरणी अहिल्यानगरच्या दोन पोलिसांना पुणे पोलिसांची नोटीस

 

पुणे : गुन्ह्याच्या संदर्भातील प्रतिज्ञापत्र आणि नावाच्या बाबत खोटी कागदपत्रे सादर करून गुंड नीलेश घायवळ याने अहिल्यानगर येथून पासपोर्ट मिळविला होता. त्याप्रकरणी आता पुणे पोलिसांनी अहिल्यानगर पोलिस दलाला एका पोलिस निरीक्षकासह दोघांना नोटीस बजावली आहे. त्यावेळी हे दोघे जिल्हा विशेष शाखेत (डिएसबी) येथे कार्यरत होते. त्यांना पासपोर्ट संदर्भातील चौकशीबाबत हजर होण्यास सांगण्यात आले आहे. घायवळ सध्या विदेशात फरार आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश घायवळ याने 2019 मध्ये अहिल्यानगर पोलिसांकडून पासपोर्ट काढला आहे. तेथील राहता पत्ता आणि इतर कागदपत्रे देऊन त्याने हा पासपोर्ट काढला. त्यावेळी कागदपत्रांची व राहत्या पत्याची पडताळणी अहमदपूर पोलिसांकडून करण्यात आली होती. मात्र, त्याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे नोंद असतानाही पासपोर्ट पडताळणी अहवाल स्वच्छ दाखविण्यात आला असा संशय व्यक्त झाला आहे. कदाचीत त्याच्या आडनावातील हेराफेरीमुळे गुन्हे प्रणालीतून त्याचे नाव सुटले असावे असा कयास लावला जात आहे. मात्र दुसरीकडे डिएसबीमध्ये कार्यरत असलेल्या पोलिसांना तो माहिती नसावा असे देखील नाही असा संशय व्यक्त केला जातोय.

याप्रकरणाची नोंद पुणे पोलिसांकडे आल्यानंतर त्यांनी संबंधित कागदपत्रांचा तपशील मागवून चौकशी सुरू केली आहे. चौकशीदरम्यान अहिल्यानगर पोलिसांनी दिलेल्या अहवालात विसंगती असल्याचे लक्षात आल्याने, विशेष शाखेतील पासपोर्ट विभागात असलेल्या तत्कालीन पोलिस निरीक्षक आणि संबंधित कर्मचारी यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

नीलेश घायवळ सध्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असून, त्याच्या टोळीवर पोलिसांनी अलीकडेच आर्थिक तपास आणि जप्तीची कारवाई सुरू केली आहे. पासपोर्टप्रकरणात आडनावाच्या नवीन घडामोडी समोर आल्याने त्याला मदत कोणी केली आणि कोणाच्या संगनमताने पासपोर्ट पडताळणी पार पडली, याकडे लक्ष लागले आहे.

घायवळच्या अडचणीत आणखी वाढ

नीलेश घायवळ पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर अनेक तक्रारदार त्याच्याविरोधात तक्रार करण्यास पुढे येत आहेत. त्यामुळे आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. त्याने दुसऱ्या व्यक्तीचे सिम कार्ड घेऊन वापर केला असल्याचे देखील समोर आले असून, त्यासंदंर्भाने देखील कारवाई होण्याची शक्यता आहे.