बारामती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बांदल; उपमुख्यमंत्र्यांनी तरूणाच्या हाती धुरा सोपविली

बारामती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बांदल; उपमुख्यमंत्र्यांनी तरूणाच्या हाती धुरा सोपविली

 

बारामती - बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी संदीप बांदल यांची निवड करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून बारामतीत अध्यक्ष बदलाच्या चर्चा सुरू होत्या. त्यामध्ये अनेकांची नावे पुढे आली होती. मात्र अजितदादांनी अचानकपणे संदीप बांदल यांना संधी दिली आहे. बारामती येथील राष्ट्रवादी भवनात जिल्हाध्यक्ष

प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बैठक पार पडली. बैठकीनंतर संदीप बांदल यांची राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदी निवडीची घोषणा करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदीप बांदल यांनी यापूर्वी बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी काम केले आहे. त्यानंतर आता त्यांना बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी बांदल यांच्या रूपाने प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्याला संधी मिळाली असल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, पवार यांनी दिलेल्या संधीचे सोने करतानाच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आगामी निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यावर आपला भर असेल अशी प्रतिक्रिया संदीप बांदल यांनी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

नवीन चेहऱ्याला संधी

दरम्यान, बारामती तालुकाध्यक्षपदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली होती. त्यात काही नावे सोशल मिडियात व्हायरल झाली होती. मात्र ऐनवेळी संदीप बांदल यांना संधी दिली. पक्षाला वेळ देणारा, कार्यकर्त्यांना सामावून घेणारा चेहरा अध्यक्ष म्हणून द्यावा ही कार्यकर्त्यांची भावना समजून घेत नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे.