तुम्ही काट माराल तर मीही काट मारणार : अजित पवार

तुम्ही काट माराल तर मीही काट मारणार : अजित पवार


बारामती: बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिनधास्त शैलीत जनतेला संबोधित केले. “मी काही साधू-संत नाही. तुम्ही मला मतदान करा, मी तुमच्यासाठी कामे करून देईन,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.

माळेगावमध्ये सर्व जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला, पण तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे आता अजित दादांनी थेट आव्हान दिले, “१८ उमेदवार निवडून द्या. मी सांगितलेलं सगळं करेन. तुम्ही जर ‘काट’ मारला तर मीही ‘काट’ मारणार.”

मागील भांडणे विसरून पुढे पाहण्याचं आवाहन करताना ते म्हणाले, “मागे झालं-गेलं ते गंगेला मिळालं. आता नवी पहाट आहे. माझ्याकडे १४०० कोटींचं बजेट आहे, त्यातलं तुमचं हिस्स्याचं मी आणून देईन. कुणी संपत नाही, संकुचित विचार सोडा, मन मोठं ठेवा.” असंही अजित पवार यांनी म्हटले.

अर्थखाते आपल्याकडे असल्याचं सांगताना त्यांनी विनोद आणि विश्वास दोन्ही मिसळले. “बारामतीत बाहेरून हजारो कोटींचा निधी आणला. वाडपी तुमच्यासमोर आहे. ओळखीचा असल्यावर जास्तच वाढतो!” तसेच “आपल्या हातात आहे, आपण काहीही करू शकतो… काहीही म्हणजे चांगलंच.” माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे कोट्यवधी रुपये वाचवल्याचं सांगताना त्यांनी आठवण सांगितली, “कारखान्यात उशिरापर्यंत थांबलो, माझ्या घरीचा डबा तिथेच खाल्ला.”

काही स्थानिक कार्यकर्त्यांनी बंडखोरी केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत ते म्हणाले, “जे बंड करतात आणि म्हणतात ‘आम्ही दादांचेच कार्यकर्ते’, तर मग बंड का? आता विरोधात उभे राहिले, निवडून आले आणि वरून निधी नाही मिळाला तर काय करणार? मी बारामतीत जे करतो ते माळेगावमध्येही करीन, फक्त साथ द्या. मी इथे झाड लावले, कुणी उपटले तर मी काय करणार? पाणी कुणी घातलं नाही तर मी मुंबईतून येऊन घालणार का? आम्ही उंटावरून शेळ्या राखत नाही.”

चुकीच्या मार्गाला गेलेल्यांनाही इशारा दिला, “कोणी चुकलं तर तो माझ्या जवळचा असला तरी पोलिसांना सांगणार. बेड्या घालून रस्त्यात वरात काढणार! परवा एका कार्यकर्त्याला मारहाण झाली, ती मला आवडली नाही. दोषी कोणत्याही पक्षाचे असले तरी कारवाई होईल.”

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व भाजपच्या तावरे गटाची स्थानिक आघाडी असलेल्या या निवडणुकीत सुयोग शामराव सातपुते यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार यांनी भैरवनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला.